आसमा सय्यद, पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महीला सरपंचाच्या पतीला आणि त्याला मदत करणाऱ्या दुसऱ्या एका सरपंचाला लाच घेतल्या प्रकरणी पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नथुराम कोंडिबा डोईफोडे वय 32 वर्ष, राह. रायकर मळा, धायरी असे महिला सरपंचाच्या पतीचे नाव असून तर बाळासाहेब धावू मरगळे वय 33 वर्ष, राह. किरकटवाडी, हवेली असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका व्यक्तीने जमीन खरेदी केल्या नंतर पूर्वीच्या मालकाच्या नावे असलेल्या घराच्या गाव नमुना 8 अ उतार्यावरील नाव कमी करुन नवीन मालकाचे नाव टाकण्यासाठी 16 हजार रुपयांची लाच घेणार्या वेल्हे तालुक्यातील वरघड गावाच्या महिला सरपंचाच्या पती नथुराम कोंडिबा डोईफोडे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. त्यांना लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गिवशी आंबेगावचा सरपंच बाळासाहेब धावू मरगळे याला पण पकडण्यात आले.
याप्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी नजीकच्या काळात वेल्हा तालुक्यातील वरघड गावात जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीमध्ये पूर्वीच्या मालकाच्या नावे असलेल्या घराच्या गाव नमुना 8 अ उतार्यावरील पूर्वीच्या मालकाचे नाव काढून टाकून तो उतारा तक्रारदाराचे नावे करुन देण्यासाठी वरघड ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारदाराने अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार हे वरघड ग्रामपंचायतीचे सरपंच सुवर्णा नथुराम डोईफोडे व त्यांचे पती नथुराम डोईफोडे यांना भेटले. तक्रारदार यांचे काम करण्यासाठी व तसा ठराव ग्रामपंचायतीच्या मिटींगमध्ये घेण्यासाठी महिला सरपंच व तिचे पती नथुराम डोईफोडे याने तक्रारदार याच्याकडे 18 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. याची पडताळणी करताना नथुराम डोईफोडे याने तडजोडीअंती 16 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सिंहगड रोडवरील नांदेड सिटी गेटच्या समोरील अतुल्य हॉटेलच्या पार्किंगमध्ये बुधवारी सापळा रचला. तक्रारदाराकडून 16 हजार रुपयाची लाच स्वीकारताना नथुराम डोईफोडे याला पकडण्यात आले. त्याला लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने गिवशी आंबेगावचे सरपंच बाळासाहेब मरगळे यालाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ.शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे तपास करीत आहेत.

