आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातील कुडाळ तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चहात माशी पडल्याने तो चहा बदलून द्यावा, अन्यथा पैसे देणार नाही असे सांगितल्याच्या रागातून पुणे येथील पर्यटक रुपेश बबन सपकाळ वय 33 वर्ष, रा. कात्रज, पुणे यांना कपडे फाडत काठीने मारहाण करून हात-पाय बांधून ठेवले. तर त्यांचे सहकारी संजय चव्हाण राह. पुणे यांनाही माराहाण केली. ही घटना गुरुवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास कुडाळ तालुक्यातील झाराप झिरो पॉईंट येथे घडली. या प्रकरणी झाराप खान मोहल्ला येथील 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधलेल्या अवस्थेतील पर्यटकाला पोलिसांच्या उपस्थितीत सोडवण्यात आले.
झाराप झिरो पॉईंट येथे रुपेश बबन सपकाळ व त्यांचे मित्र सकाळी 6 वाजताच्या सुमारास संशयित तनवीर करामत शेख रा. झाराप खान मोहल्ला यांच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी चहाच्या कपात माशी पडली म्हणून रूपेश सपकाळ यांनी यांनी चहा बदलून मागितला. तो बदलून दिला नाही म्हणून चहाचे पैसे देणार नाही असे सपकाळ यांनी तनवीर करामत शेख याला सांगितले. त्याचा त्याला राग येऊन त्याच्यासह संशयित आरोपी शराफत अब्बास शेख वय 57, अब्बास उर्फ साहिल शराफत शेख वय 18, श्रीम. परवीन शराफत शेख वय 42, साजमीन शराफत शेख वय 19, तलाह करामत शेख वय 26, सर्व रा.-झाराप खान मोहल्ला, ता-कुडाळ अशा सर्वांनी मिळून बेकायदा जमाव केला व रूपेश सपकाळ यांना काठीने व हाताच्या ठोशांनी मारहाण केली. तसेच रूपेश सपकाळ याचा मित्र संजय सुदाम चव्हाण यालाही मारहाण केली. तसेच रुपेश सपकाळ यांचे कपडे फाडून त्यांचे हातपाय दोरीने बांधून त्याला अटकावून ठेवले.
या घटनेनंतर तेथील एका व्यक्तीने पोलिसांच्या डायल 112 या अति तातडीच्या सेवेद्वारे माहिती दिली. यानंतर कुडाळचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ममता जाधव, पोलिस योगेश मुंढे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तोपर्यंत तो पर्यटक हातपाय बांधलेल्या स्थितीत होता . त्याचे दोन्ही हात मागे करून बांधले होते. तसेच पायही उलटे दुमडून बांधण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच त्याला बांधलेल्या अवस्थेतून मुक्त केले. या संदर्भात संबंधितांची तक्रार नसली तरी कुडाळ पोलिसांनी घटनास्थळ वरील परिस्थिती ही अंगावर शहारे उभे करणारे असल्याने स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दाखल करत एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

