पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एकधक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वाडी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने नागपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. हेमराज ज्ञानेश्वर जिचकार वय 49 वर्ष रा. पोलिस क्वार्टर, गिट्टीखदान नागपूर असे आत्महत्या करणाऱ्या शिपायाचे नाव आहे.
वाडी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई हेमराज जिचकार यांनी आपल्या घरीच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 3.00 वाजताच्या दरम्यान समोर आली आहे. हेमराज यांनी आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा पोलिस विभागात सुरू आहे.
मृतक हेमराज ज्ञानेश्वर जिचकार हे 2007 मध्ये पोलिस दलात रुजू झाले होते. मागील 3 वर्षांपासून ते वाडी पोलिस स्टेशन येथे पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत होते. आज त्यांची साप्ताहिक सुटी असल्याने ते घरी होते. दुपारी 2:00 वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी लग्नाला बाहेर गेल्या होत्या. याशिवाय मुलगा मंथन वय 12 वर्ष मुलगी नवीन वय 10 वर्ष हे दोघेही शाळेत गेले होते. यादरम्यान हेमराज यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
3:30 वाजताच्या सुमारास त्यांची दोन्ही मुल शाळेतून घरी आले त्यांनी दार ठोठावले असता आतून कुठलाही प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर त्यांनी खिडकीतून आत बघितले असता, त्यांना जोरदार धक्का बसला त्यांचे वडील हॉलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यावेळी मुलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी दार तोडून आत प्रवेश केला.
याबाबत गिट्टीखदान पोलिसांना माहिती देण्यात आली, माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्यासह ताफ्याने घटनास्थळी धाव घेतली. जिचकार यांना खाली उतरुवून त्यांना मेयो रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. यावेळी पोलिसांचा तपासात त्यांच्याकडे कुठलीही सुसाईड नोट आढळून आली नाही. त्यामुळे नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत, तपास सुरू केला आहे.
प्लॉटच्या खरेदीतून तणावात: हेमराज जिचकार यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची चर्चा पोलीस विभागात सुरू आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी फेटरी येथे एक प्लॉट खरेदी केला होता. त्यासाठी त्यांना 8 लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यातूनच ते प्रचंड आर्थिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्यापही कारण अस्पष्ट असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

