अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना नेते सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना वित्तीय वर्ष 2025-26 या अर्थसंकल्पात या शहरातील विषय घेऊन आर्थिक तरतुद करून विषयाची अंमलबजावणी करण्यात यावी. यासंबंधी नगर पालिका मुख्याधिकारी यांच्या सोबत विस्तृत चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
नगर परिषद हिंगणघाट ही संस्था या शहराचे पालकत्वाची जबाबदारी स्वीकारते म्हणून, शहरातील सर्व सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करणे, नगर परिषदचे कर्तव्य आहे. जवळ-जवळ तीन ते चार वर्षांपासून या संस्थेला शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून कार्यरत नसल्याने जनतेच्या प्रश्नांवर इतर पक्ष आपली भूमिका मांडताना दिसून येत नाही. प्रामुख्याने भाजप हा पक्ष जो फक्त पैश्याच्या जोरावर निवडणुका लढवितो. त्यांना जनतेशी व शहरातील मूलभूत प्रश्नांबाबत काहीही देणे घेणे नाही. शिवसेना नेहमी शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रीदवाक्या नुसार सतत या समाजासमोर 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्याचा दृष्टीकोन ठेऊन सामान्य लोकांच्या हितासाठी काम करीत आहे. म्हणून शिवसेनेकडून खालील काही महत्त्वाच्या विषयाची तरतुद करण्यात यावी.
शहरातील लोकांना आर्थिक निकषांवर घन कचरा संकलन कर लावण्यात यावे. कारण या शहरातील मोठ्या प्रमाणात लोक रोज-मजुरी करणारे आहेत. तर काही लोक मिल मजदुर आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे, या लोकांना या महागाईच्या काळात कसे बसे घर चालवणे, मुलांचे शिक्षण करणे, आरोग्य, विद्युत, नगरपरिषदेचे मालमत्ता कर कसे तरी भरून कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. शासकीय कर्मचारी, विविध व्यवसाय करणारे श्रीमंत व्यावसायिक, या लोकांना घन कचरा संकलन कर जो आहे. त्याच बरोबरीने कर आकारणी या साधारण लोकांना लागू आहे. यात कुठेतरी मोठया प्रमाणात तफावत आहे. मध्यमवर्गीय लोकांसोबत नगर परिषद कडून कुठेतरी अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात नगर परिषदने जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढून मध्यमवर्गीय लोकांना या करा पासून दिलासा मिळून दिले पाहिजे. याकरिता योग्य तरतुद करावी.
हिंगणघाट शहरातील काही दाट वस्ती आहे. जसे काजी वार्ड, फुले वार्ड, भीम नगर वार्ड, हनुमान वार्ड, निशाणपुरा वार्ड, कोष्टी पुरा भाग, सेंट्रल वार्ड, नंन्नहाशाह वार्ड या भागातील गल्ली बोळिच्या ठिकाणी घंटा गाडी जात नाही. तरी त्या भागातील लोकांना कचरा संकलन कर लाऊन पावती पाठविले जातात. अश्या ठिकाणच्या लोकांना घन कचरा संकलन कर रद्द करण्याचा प्रस्तावित करावे.
हिंगणघाट शहर विविध खेळांसाठी ओळखल्या जातात. नवीन पीढी तसेच खेळाडू करिता उन्हाळ्यात प्रत्येक खेळाचे शिबीर घेण्यात यावे. जे या पूर्वी नगर परिषद घेत असे. जेणे करून मुलांनी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवले पाहिजे. मुलांचे आरोग्य व हित पाहता या साठी वार्षिक तरतुद करणे अतिशय गरजेचे आहे.
शहरातील विविध शासकीय कार्यालय तथा जिल्हा सत्र न्यायालय, दिवाणी व फौजदारी न्यायालय, मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असल्यामुळे ग्रामीण भागातील लोक शहरात विविध कामासाठी येत असतात. त्यांना व विशेषतः महिलांकरिता शौच्छालय नसल्याने मोठ्या अडचणींचा निर्माण होते. म्हणून काही मोठ्या शहरातील “पे आणि यूज” च्या माध्यमातून बस स्थानक परिसर, तहसील कार्यालय समोर, आठवडी बाजार, मुख्य बाजारपेठच्या ठिकाणी मुत्रीघर, शौच्छालय तयार करण्याकरिता आर्थिक तरतुद करावी.
शहरातील अंध व अपंग लोकांसाठी शासनाकडून नियमाप्रमाणे मदत मिळत आहे. ती पुरेशी नाही. म्हणून काही अपंग लोकांना जर नगर परिषदने तहसील कार्यालयाजवळचे गाळे किंवा इतर कोणत्याही नगर परिषदच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली, तर ते छोटे -मोठे व्यवसाय करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करू शकतात. परंतु त्या लोकांना एका अटी शर्तीवर गाळे द्या की, ती व्यक्ती स्वतः व्यवसाय करीत असेल. दुसऱ्याला भाड्याने दिले तर त्यांचा करारनामा रद्द करण्यात यावे. शहरातील गरोदर महिला तसेच बाळंतीण महिला, लहान मुलांसाठी दर दोन महिन्यात प्रभाग निहाय शिबीर घेऊन आरोग्य तपासणी केली पाहिजे त्यासाठी सुध्दा आर्थिक तरतुद करावी.
नगर परिषदच्या अंतर्गत एक कनिष्ठ महाविद्यालय येते म्हणजे जी. बी.एम.एम महाविद्यालयात या ठिकाणी पूर्वी वर्षाला सांस्कृतीक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा होत होते. परंतु या दोन ते तीन वर्षांपासून सदर कार्यक्रम आयोजित केल्या जात नाही. याच शाळेतील विद्यार्थी विविध खेळात भाग घेऊन जिल्हा व राज्य स्तरावर पारितोषिक आणि प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांचा फायदा व्हायचा. आता हे सर्व होत नसल्याने या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं मोठे नुकसान होत आहे. त्याकरिता सुध्दा आपण योग्य नियोजन करून आर्थिक तरतुद करावी. या सहा मागण्यांसाठी आपण या चालू वर्षात तरतुद करून घ्यावे असे शिवसेनेची मागणी आहे.
या मागणीवर जर नगर परिषदेला काही तांत्रिक अडचणी येत असेल तर, यावर जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून जनतेच्या हितासाठी या सर्व मागण्या निकाली काढा, असे शिवसेनेकडून निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले. निवेदन देताना माजी नगरसेवक मनीष देवडे, प्रकाश अनासाने, शंकर मोहमारे, गजानन काटवले, पप्पू घवघवे इत्यादी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

