युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सध्या 10 वी आणि 12 वीची परीक्षा सुरू असून त्यात नागपूर जिल्ह्यातील कुही येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 10 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने नापास होण्याच्या भीतीपोटी बसस्थानकावरच विष प्राशन करून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पहिल्यांदा दहावीत नापास झाल्यानंतर हा विद्यार्थी पुन्हा परीक्षा देत होता. आर्यन विजय लुटे वय 17 वर्ष, राह. आकोली, ता. कुही असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.
शनिवारी दिनांक 1 मार्च रोजी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. अभ्यास न झाल्याने व आपण उत्तीर्ण होणार नाही या भीतीने चक्क विद्यार्थ्याने कुही बसस्थानकावर धान्य टिकविण्यासाठी वापरण्यात येणारे विषारी द्रव्य त्याने प्राशन करून आत्महत्या केली. यावेळी बसस्थानकावर याची माहिती होताच एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक आर्यन हा कुही येथील एका विद्यालयात शिक्षण घेत होता. तो मार्च 2024 च्या 10 वीच्या परीक्षेत नापास झाला होता. ‘एटीकेटी’ नियमानुसार त्याने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अकरावीत प्रवेश घेतला होता. परंतु, आता दोन परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विषयात पास होणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने तो सप्टेंबर महिन्यातील पूरक परीक्षेस बसला. परंतु, पेपरच्या दिवशी नागपूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याचा इतर गावांशी व उमरेडसारख्या शहराशी संपर्क तुटला होता. त्यामुळे मृतक आर्यन हा परीक्षा देण्यासाठी उमरेडला जाऊ शकला नव्हता.
अभ्यास होऊनही केवळ पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहचता न आल्यामुळे आर्यन पुन्हा नापास झाला. त्यामुळे तो नैराश्यात होता. आता त्याच्याकडे असलेल्या शेवटच्या संधीत दोन्ही विषयात उत्तीर्ण होणे गरजेचे होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो खूप अभ्यास करीत होता. मात्र, इंग्रजी विषयाची मनात भीती आणि नापास होण्याच्या चिंतेमुळे तो तणावात होता.
बसस्थानकावरच बेशुद्ध झालेल्या आर्यनच्या मित्राने आर्यनच्या वडिलांना फोन करुन ही माहिती दिली. तोपर्यंत आर्यनला कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. माहिती मिळताच त्याचे वडील आणि अन्य नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात रवाना केले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच त्याचा मृत्यू झाला.

