मानवेल शेळके अहिल्यानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहिल्यानगर:- शासकीय आश्रमशाळा मवेशी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनिचा शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नाशिक येथे उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. ईश्वरी महादू धिंदळे वय 14 वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ईश्वरी या विद्यार्थिनीचा मृत्यू हा शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला जातोय.
या प्रकरणात शासकीय आश्रमशाळा मवेशी शाळेच्या मुख्याध्यापक, अधिक्षकांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी राजूर आदिवासी विकास प्रकल्पाच्या माजी अध्यक्ष सुनीता भांगरे यांनी केली आहे. भांगरे यांनी पत्रकात म्हटले की, या विद्यार्थिनीला डिसेंबर, जानेवारीमध्ये कुष्ठरोग आणि त्यानंतर कावीळ झाल्याचे निदर्शनास आले होते. शालेय प्रशासनाने तिला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, उपचारानंतरही तिच्यात सुधारणा झाली नाही. यावेळी तिला तातडीने मोठ्या रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. मात्र, शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनीचा जीव गेला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

