राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुंबई येथून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. येथील कुरार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मुंबई पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. सुभाष कांगणे वय 37 वर्ष असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून मृतक सुभाष यांनी मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. तर मृत्यकाच्या कुटुंबीयांनी पोलिस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा आरोप केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आत्महत्या करणारे सुभाष कांगणे हे गोरेगाव नागरी निवारा परिषद वसाहत इथं आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. सोमवारी संध्याकाळी 6.00 वाजताच्या दरम्यान त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुभाष कांगणे हे मुळचे नाशिक येथील रहिवाशी होते. आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह ते गोरेगाव मधील नागरी निवारा परिषद वसाहतीत राहत होते. 3 महिन्यापूर्वीच त्यांची बदली मालवणी पोलीस स्टेशन मधून कुरार पोलीस स्टेशनमध्ये झाली होती. त्यांची बायको आणि मुलं हे गावी राहत होती. ते एकटे घरी राहत होते. सुभाष कांगणे यांनी सोमवारी संध्याकाळी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांचे नातेवाईक जेव्हा घरी आले तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर घटनेची माहिती दिंडोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
या प्रकरणाचा तपास दिंडोशी पोलीस करत असून सुभाष कांगणे यांच्या आत्महत्येमागील नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाचा दिंडोरी पोलीस अधिक तपास करत आहे.