प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदि आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. योजनेसाठी सन 2024-25 मधील अर्ज करण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाइन पोर्टलद्वारे दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे आणि या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे आपोआप स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे संपर्क साधावा व पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.