विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी.मो. नं.9421856931
एटापल्ली : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय एटापल्ली अंतर्गत जीजावंडीच्या जंगलातून सेमल ग्रामीण भागातील नाव सावरी या लाकडाच्या तस्करी प्रकरणात वनविभागाने एका आरोपीला अटक केली आहे.
मिहीर निमाई दत्ता रा.पाखंजूर छत्तीसगड असे या आरोपीचे नाव असून आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असे सांगण्यात येत आहे.
मागील आठवड्यात जिजावंडी येथे सिमल लाकडाने भरलेला ट्रक पकडण्यात आला. पकडण्यात आलेल्या ट्रकला आरोपींनी रात्रभरात पळविले. पाखंजूर येथे नेण्यात आले. यानंतर वनविभागाच्या ताफ्याने पाखंजूर येथे जाऊन ट्रक जप्त केला. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय एटापल्ली येथे आणला. या प्रकरणात चार आरोपी असल्याचे वनविभागाच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दोन आरोपी पाखंजूर येथील तर दोन आरोपी विकासपल्ली येथील आहेत. एक आरोपी मिहीर निमाई दत्ता याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.मिहीर दत्ता याला पकडण्यात आल्यामुळे सेमल लाकडाच्या तस्करीचे कोडे उलगडणार आहे. सामान्यपणे मोठी किंमत मिळते म्हणून सागवान लाकडाची तस्करी करण्यात येत असल्याचे दिसते. पहिल्यांदाच सेमल उर्फ सावरी या लाकडाच्या तस्करीचे प्रकरण पुढे आले. या झाडाचा नेमका उपयोग काय? हा प्रश्न आहे. काहींच्या मते प्लायवूडसाठी, काहींच्या मते औषधी गुणधर्मांसाठी, तर काहींच्या मते इमारत बांधकामासाठी या लाकडाचा उपयोग होतो. तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
आरोपीला उद्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अहेरी येथे उपस्थित केले जाणार असून वन विभागाकडून वनकोठडीची मागणी करण्यात येणार आहे. तेव्हा नेमका सेमल लाकडाच्या तस्करीचा उलगडा होईल. उर्वरित आरोपींचा माग काढणे वनविभागाला सोपे जाईल.

