प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.10:- वर्धा जिल्ह्यातून एक खळबळजनक उडविणारी घटना समोर आली आहे. जिल्हातील ग्रामपंचायत मदनी येथे दिनांक 6 मे रोजी बाल विवाह होत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास प्राप्त झाली होती. कार्यालयाने संबंधित विविध विभागाच्या सहकार्याने होणारा हा विवाह रोखला. समाज आज शिक्षित असतानाही आणि शासनाने बाल विवाह कायद्याने बंद केले असतानाही वर्धा जिल्ह्यात बाल विवाह होत असल्याचे समोर आल्याने खळबळ माजली आहे.
मदनी या गावातील ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी चौकस राहून तसेच महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेने व पोलीस विभागाचे सहकार्य घेऊन बालविवाह थांबविण्यात मोलाची कामगिरी पार पाडली.
सदर वेळी ग्रामसेवक श्री.करपाते यांनी मुलीचे आई वडील व मुलाचे आई वडील आणि इतर नातेवाईक यांना ग्रामपंचायत येथे बोलावुन मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, असा जबाबनामा लिहून घेतला तसेच समज दिली. यासोबतच मुलीचा विवाह 18 वर्षाच्या आत करण्याचा प्रयत्न केला तर बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. तसेच बाल कल्याण समिती वर्धा येथे बालिकेला सादर करण्यास बालिकेच्या आई व वडील यांना सांगितले. याकरीता गावातील गावकऱ्यांकडून सदर कार्याबाबत ग्रामसेवक यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
बाल विवाह थांबबविण्याकरीता ग्रामसेवक श्री.करपाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी, समन्वयक चाईल्ड हेल्पलाईन आशिष मोडक, सामाजिक कार्यकर्ता, मेघलता तमगिरे व शितल घोडराव, अमर कांबळे, क्षेत्रीय कार्यकर्ता तसेच गावकरी उपस्थित होते. गावामध्ये बाल विवाह होत असल्यास गावातील नागरीकांनी त्याची माहिती 1098 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी केले आहे.

