अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- संस्कृतशी जोडले जाणारे लोक देशभक्ती, सामाजिक सुधारणांचे दर्शन आणि कर्तव्याची भावना अनुभवतात. संस्कृत ही भाषा केवळ एक दैवी भाषा नाही तर हळूहळू, संस्कृत भारतीच्या प्रयत्नांमुळे, ती एक लोकप्रिय भाषा देखील बनत आहे असे विचार संस्कृत भारती महाराष्ट्राचे पश्चिम मध्य क्षेत्र संघटन मंत्री संजीव कुमार यांनी व्यक्त् केले. ते संस्कृत भारती विदर्भ प्रांत प्रबोधन वर्ग भारत विद्यालय हिंगणघाट येथे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणुन बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट चे सचिव रमेशराव धारकर, उद्घाटक आमदार समीर कुणावार, संस्कृत भारती विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. मोहन खेडकर, संस्कृत भारती विदर्भ प्रांत दिलीप सेनाड, प्रांत प्रशिक्षण प्रमुख शैलजा पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना संजीव कुमार म्हणाले की, संस्कृतभारती लोकांना संभाषणाच्या पद्धतीद्वारे संस्कृतमध्ये सहज संवाद साधण्यास सक्षम करत आहे. संस्कृत भारती दरवर्षी प्रबोधन वर्ग आयोजित करते. वर्गाची दैनंदिन दिनचर्या पूर्णपणे भारतीय आणि स्वदेशी आहे. ज्यामध्ये लोकांना सामाजिक जीवन, व्यवस्थांचा योग्य वापर आणि त्यांच्या संस्कृतीची जाणीव होते. वर्गांमध्ये, पुरुष, महिला आणि सर्व जाती आणि वर्गाचे लोक कोणत्याही भेदभावाशिवाय एकत्र राहण्याचा आणि एकत्र जेवण्याचा सराव करतात, जे समाजाला एकतेच्या धाग्यात बांधण्यासाठी आवश्यक आहे. संजीव कुमार यानी आपल्या भाषणात संस्कृत लोकांच्या जीवनात कसा बदल घडवून आणत आहे हे स्पष्ट केले व संस्कृत भारतीच्या इतर पैलूंवर प्रकाश टाकला.
याप्रसंगी आमदार समीरभाऊ कुणावार, रमेशराव धारकर यानीही मनोगत व्यक्त केले तर शैलजा पांडे यांनी प्रास्ताविकात संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्त्व व संस्कृत भाषा सर्व भारतीय भाषांची जननी आहे, ती जनमानसापर्यंत पोहोचविणे व ती जनभाषा व्हावी हा मुख्य उद्देश ठेवून या निवासी वर्गाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. या प्रशिक्षण वर्गाला चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ व नागपूर या विदर्भ प्रांतातील एकूण 50 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
वर्गस्थानी संस्कृत वस्तुप्रदर्शिनी व संस्कृत भारती पुस्तक विक्री केंद्र आहेत. याचा संस्कृत प्रेमींनी लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे संचालन सौ. केतकी डांगे, नागपूर यांनी तर आभार प्रदर्शन शिल्पा साठे, अकोला यांनी केले व कार्यक्रमाची सांगता कल्याणमंत्राने करण्यात आली.

