वणा नदी संवर्धन समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथे डंकीन वणा नदीवर सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या बांधकामादरम्यान पियुष इन्फ्रा कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून साठा जमा करण्यात आला होता. महसूल विभागाने त्या रेतीवर नायब तहसिलदार सागर काबंळे यांनी जप्तीची कार्यवाही केली, मात्र आजपर्यंत संबंधित कंपनीवर कोणताही दंड लावण्यात आलेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर आणि संशय पद आहे.
तसेच, या बंधाऱ्याच्या खोदकामादरम्यान सापडलेले मानवी सांगाडे कंपनीने परस्पर विल्हेवाट लावले. हा कायद्याचा गंभीर भंग असून देखील, संबंधित कंपनीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यासंदर्भात पोलिस विभागाकडून देखील कोणतीही माहिती अथवा कारवाई स्पष्ट करण्यात आलेली नाही.
या दुहेरी दुर्लक्षामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजूरकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून तीन दिवसांत ठोस कार्यवाही करण्याची मागणी तहसीलदार योगेश शिंदे यांच्याकडे केली आहे. अन्यथा समितीमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रकरणी यापूर्वी दि. 17 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी, वर्धा यांना व दि. 23 मे 2025 रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

