सीमा सुरूशे वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- मागील काही दिवसांपासून राज्यात महिलावर सतत सुरू असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिला सुरक्षेवर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यात आता वाशिम जिल्ह्यातील कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक थरकाप उडविणारी घटना समोर आली आहे. येथील काजळेश्वर गावाजवळ असलेल्या एका पुलाखाली 20 वर्षीय मतिमंद तरूणीचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. माया कोड़ापे असे मृतक तरुणीचं नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास उघडतीस आली.
गावकऱ्यांना एका तरुणीनचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची गांभीर्य ओळखत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तरुणांचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला, तिचं डोकं चिरडलेलं होतं. तिच्या मृतदेहाजवळ चपात्या आणि भाजी आढळली. त्यावरुन ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचं दिसतंय.
प्राप्त माहितीनुसार, हत्या करण्यात आलेली तरुणी माया ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तीन दिवसांपूर्वी ती रात्री रस्त्यावर भटकताना आढळली होती, तेव्हा स्थानिकांनी तिला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवलं होतं. त्यानंतर ही हत्येची घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह कारंजा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला, या घटनेची माहिती मृतक मायाच्या कुटुंबाला आणि नागरिकांना कळताच कुटुंबीय आणि आदिवासी समाजाचे अनेक लोक तिथे जमले. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मायासोबत बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनास्थळावरून फॉरेंसिक पुरावे गोळा करण्यात आले असून, दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतर बलात्काराची पुष्टी होऊ शकेल. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास तीव्र केला आहे.

