अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नारायण सेवा मित्र परिवार हिंगनघाट च्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त दि. १५ जून २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावले.
स्थानिक रत्न विद्या निकेतन व बन्सीलाल कटारिया हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित या शिबिराचे उद्घाटन वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष भागचंद ओस्तवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पी.व्ही. टेक्सटाईलचे प्रमुख पारस मुनोत, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक मुखी, वनश्री पुरस्कार प्राप्त दिगंबर खांडरे, समाजसेविका किरण मुनोत, उपजिल्हा रुग्णालय वर्धा येथील डॉ. गावंडे, समाजसेवक विश्रांती कुंटेवार, उद्योजक अशोक मिहानी, रत्न विद्या निकेतन शाळेचे सचिव हेमंत ओस्तवाल आणि नारायण सेवा मित्र परिवाराचे कार्याध्यक्ष मनोज सिंघवी यांची उपस्थिती होती. उपस्थित पाहुण्यांचे ‘नीम का एक पेड़ माँ के नाम’ या संकल्पनेवर आधारित कडुलिंबाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. मुखी आणि डॉ. गावंडे यांनी रक्तदानाच्या महत्त्वावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी रक्तदानाचे फायदे आणि प्रक्रिया याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात भागचंद ओस्तवाल यांनी रक्तदानाला ‘महादान’ असे संबोधून, सर्व नागरिकांना या महान कार्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
रक्त संकलनाचे कार्य उपजिल्हा रुग्णालय वर्धा येथील डॉ. गावंडे आणि त्यांच्या चमूने यशस्वीरित्या पार पाडले. या शिबिरासाठी किशोर जेस्वानी, विक्की ठाकूर, अमोल भुतडा, गौरव सायंकार, प्रा. लतीका बेलेकर व सौ. अनुराधा मोटवानी यांनी रक्तदात्यांशी संपर्क साधून रात्रंदिवस परिश्रम घेतले.
या प्रसंगी, नारायण सेवा मित्र परिवाराने समाजाप्रती आपली बांधिलकी जपत एका गरजू मुलीचे कन्यादान केले. तिच्या नवीन संसारासाठी आवश्यक गृहपयोगी वस्तू, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू भेट देऊन तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांनी केले, तर संचालन दुर्गाप्रसाद यादव यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. किरण वैद्य यांनी मानले. या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नारायण सेवा मित्र परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

