प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- सध्या देवळी शहरातून ए.पी.एम.सी. समोरून जाणाऱ्या वर्धा-देवळी रोडचे काम सुरू आहे. हा मार्ग शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गावाच्या प्रवेशाचा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यालगत कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसी, ग्रामीण रुग्णालय, जिनिंग फॅक्टरी, खरेदी विक्री, मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, शासकीय विश्रामगृह, पेट्रोल पंप, तंत्रशिक्षण शाळा व यशवंत महाविद्यालय आहे. याच मार्गावरील बाजार समितीत विदर्भातील प्रसिद्ध बैल बाजार सुद्धा भरतो. दहेगाव-वायगाव महामार्ग याच मार्गे जाणार आहे. त्यामुळे या रोडवर शेतकरी-शेतमजूर, कामगार, विद्यार्थी व नागरिकांची नेहेमीच मोठी वर्दळ असते तसेच सोयाबीन-कापसाच्या हंगामात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस, सोयाबीन भरून येणाऱ्या विविध वाहनांची प्रचंड गर्दी असते. येणाऱ्या काळात ही वाहतूक अधिक वाढणार असून अपघाताचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.
सदर ठिकाणी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे रस्त्याचे काम सुरू होण्याआधीच दोन्ही बाजूंनी नाल्यांचे बांधकाम करण्यात आले होते. यामुळे रस्त्याची रुंदी अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना भविष्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव व देवळी शहरातील सजग नागरिकांनी यासंदर्भात हरकत घेतल्यानंतर एका बाजूची नाली तोडण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूची नाली अद्यापही कायम आहे, ज्यामुळे रस्ता अपेक्षित प्रमाणात रुंद होऊ शकत नाही.
याबाबत युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोनदा यापूर्वीच निवेदन सुद्धा दिले आहे मात्र यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पत्राद्वारे उत्तर दिले आहे. परंतु त्या पत्रात नागरिकांची दिशाभूल करणारे व असमाधानकारक उत्तर आहे. त्यात त्यांनी बायपास झाल्यामुळे शहरातील वाहतूक कमी झाल्याचा जावईशोध लावला आहे. तसेच शहरातील मोठी औद्योगिक वसाहत (MIDC) याचा उल्लेख जाणीव पूर्वक टाळला आहे. तसेच दहेगाव ते वायगाव हा महामार्ग देवळी शहरातून कृषी उत्पन्न बाजार समिती समोरूनच जातो आहे. आणि या महामार्गाचे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. सदर रस्त्याचे बांधकाम रस्त्याच्या मध्यभागी झाले नसून एका बाजूची नाली न तोडल्यामुळे रस्त्याची एक बाजू बाजार समिती, एमआयडीसी व तंत्रशिक्षण शाळेच्या संरक्षण भिंतीपर्यंत गेली आहे. यावरून असे लक्षात येते की, बांधकाम ओढून-ताणून, जोर-जबरदस्तीने केले जात आहे. रस्त्याच्या एका बाजूने नाली व दुसऱ्या बाजूने जागाच शिल्लक राहिलेली नाही.
त्यामुळे दुसऱ्या बाजूची शिल्लक असलेली नाली तातडीने तोडून रस्ता मधोमध व प्रशस्त करण्याचे मागणीकरिता मी दिनांक २५ जून २०२५ रोज बुधवार पासून देवळी येथील क्रांतिवीर महादेवराव ठाकरे पुतळ्याजवळ देवळीतील विविध सामाजिक- राजकीय पक्ष संघटना व देवळीकर नागरिकांच्या सहकार्याने बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु करीत आहे. या रस्त्याचे बांधकाम एकदा पूर्ण झाले की देवळीकरांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आत्ताच आंदोलन करणे गरजेचे आहे. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती वा संस्थेविरोधात नसून देवळीकरांच्या सुरक्षिततेसाठी व हक्कासाठी आहे.
तरी सर्व देवळीकर नागरिकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन आपल्या हक्काच्या सुरक्षित रस्त्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किरण ठाकरे अध्यक्ष, युवा संघर्ष मोर्चा देवळी विदर्भ अध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना

