🖊️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर वर्षभरातच प्रशासकीय कारणास्तव पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये राज्य गुप्तवार्ता येथे बदली करण्यात आली होती. या बदलीविरोधात त्यांनी केंद्रिय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) याचिका दाखल केली होती. त्यानुसार त्यांच्या बदलीस स्थगिती मिळाली होती. दरम्यान या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून, तत्कालीन आदेशानुसार पोलीस अधीक्षकपदी शहाजी उमाप यांची बदली करण्याचे आदेश कॅटने दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाटील यांची बदली होणार असून, त्यांच्या जागी उमाप पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
राज्य गृह मंत्रालयाने ९ सप्टेंबर २०२१ रोजी प्रशासकीय कारण सांगत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची मुंबई राज्य गुप्त वार्ता विभागात उपायुक्त म्हणून बदली केली होती. त्यांच्या जागी तत्कालीन व्हीआयपी सुरक्षा विभागाचे उपायुक्त शहाजी उमाप यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. या बदलीमुळे जिल्ह्यात पडसाद उमटले होते. पाटील यांच्या समर्थनार्थ शेतकर्यांसह अनेक संस्थांनी बदलीस विरोध दर्शवत बॅनर लावले होते. त्याचप्रमाणे पाटील यांनी न्यायाधिकरणात अर्ज दाखल करीत न्याय मागितला होता. त्यानुसार त्यांच्या बदलीस स्थगिती मिळाली होती. दरम्यान, त्यांच्या याचिकेवर सप्टेंबर महिन्यात सुनावणी पूर्ण झाली. त्यानुसार त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नव्याने उचित ठिकाणी बदली करण्यास कॅटने संमती दर्शवली आहे. त्याचप्रमाणे शहाजी उमाप प्रशाकीय रचनेनुसार नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. पाटील यांची पुढील चार आठवड्यांमध्ये बदली करुन उमाप यांना नाशिक अधीक्षक पदी नियुक्त करण्याचे निकालात म्हटले आहे. सध्या उमाप यांच्याकडे राज्याच्या नियंत्रण कक्ष अधीक्षक पदाची जबाबदारी असून, ते नाशिकमध्ये रूजू होण्यास इच्छुक आहे. दरम्यान, नाशिक पोलीस आयुक्तालयातील भारतीय पोलिस सेवेतील एक पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षकपदी बदलीस इच्छुक होते. मात्र, या निकालामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे.

