✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- धक्का लागल्याची कुरापत काढून एकाने दांडीया पाहणाऱ्या युवकासह त्याच्या होणाऱ्या सासूवर कोयत्याने हल्ला चढवत त्यांना जखमी केले. गंगापूर रस्त्यावरील आनंदवल्ली भागात ही घटना घडली.
या बाबत चेतन बेजेकर वय २५ वर्ष, कोळीवाडा, आनंदवल्ली यांनी तक्रार दिली. बेजेकर हे होणारी पत्नी, सासू व मेव्हणा यांच्यासमवेत रात्री दांडीया पाहण्यासाठी गेले होते. यावेळी संशयित मनोहर गायकवाडने मागील वादात धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घातला.
पाठीमागून कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. सासू सविता शिंदे या आपल्याला वाचविण्यासाठी आल्या असता संशयिताने त्यांच्या हाताच्या अंगठ्याला कोयता मारून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित मनोहर गायकवाडला अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.

