तात्काळ उपलब्ध न झाल्यास स्वतंत्र दिनी करणार उपोषण.
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन गडचिरोली:- एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही संपूर्ण भाग जंगलात पसरलेला असून लोकसंख्याही लक्षणीय आहे. मात्र दुर्दैवाने या भागात रस्ते, पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवा अजूनही मागेच पडलेल्या आहेत. विशेषतः जारावंडी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची उपलब्धता नसल्यामुळे अनेक रुग्णांना गंभीर स्थितीत देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अलीकडेच पेंदुळवाही येथील एक शेतकरी टॅक्टर उलटून गंभीर जखमी झाला. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे त्याला खाटेवरून जंगल पार करत रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना ताजी असतानाच अशाच अनेक घटना मागील काही महिन्यांपासून सातत्याने समोर येत आहेत. गरोदर माता, अपघातग्रस्त, जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध अशा अनेकांना वेळेवर दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा अभाव हा जीवघेणा ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर जारावंडी ग्रामपंचायतीचे सदस्य मुकेश वामन कावळे यांनी प्रशासनाकडे तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले असून जर लवकरात लवकर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर येत्या १५ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.
ग्रामस्थांनी देखील या मागणीला पाठिंबा दर्शवला असून लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. आता प्रशासन या गंभीर विषयाकडे कसे लक्ष देणार याची चर्चा सुरू झाली आहे.

