मधुकर गोंगले, उपसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353 सी या मार्गाचे काम मागील तीन वर्षापासून संथगतीने सुरु आहे. सद्यस्थितीत पावसाळयात या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांना डबक्याचे स्वरुप आले आहे. यामुळे वाहन धारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या डबकेमय खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र, याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कमालीचे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवावे अन्यथा या परिसरातील नागरिकांना घेऊन खड्ड्यात वृक्षारोपण करीत आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग 353 सी या मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागामार्फत कंत्राटदारातर्फे सुरु आहे. मात्र कामाच्या संथगतीमुळे मागील तीन वर्षापासून सदर मार्ग पूर्णत्वास आलेले नाही. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी रेलचेल असते. सदर मार्ग थेट तेलंगणा, छत्तीसगड, आंध्रप्रदेशला जोडत असल्याने अवजड वाहनांचीही या मार्गावर भरमार आहे. या अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गाअंतर्गत येत असलेल्या रेपनपल्ली-उमानूर-सिरोंचा या मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी गंभीर स्थिती झाली आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले गेले असल्याने खड्ड्यांना जणू डबक्याचे स्वरुप आले आहे. या खड्ड्यांतून वाहन काढतांना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाणी साचलेल्या वाहन धारकांना अंदाज येत नसल्याने दररोज अपघात घडून येत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाता आमंत्रण दिले जात असतांना संबंधित विभागाद्वारे कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संबंधित प्रशासनाने तत्काळ रेपनपल्ली-उमानूर15 तारखेपर्यंत न बुजविल्यास 18 ला या परिसरातील नागरिकांना घेऊन खड्ड्यात वृक्षारोपण करीत रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडवार यांनी दिला आहे.

