इन्फंट काँन्व्हेंट येथे देशभक्तीच्या उत्साहात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन इन्फंट काँन्व्हेंट, राजुरा येथे देशभक्तीच्या जयघोषात आणि सांस्कृतिक वैभवात साजरा करण्यात आला. इन्फंट जिजस सोसायटी संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल, कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग व रामचंद्रराव धोटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ७:४५ वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड मार्च सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते आणि देशभक्तीने भारावलेले नृत्यप्रयोग यांनी वातावरण अधिक रंगतदार झाले.
यावेळी माजी आमदार सुभाष धोटे म्हणाले “आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानाचे स्मरण करण्याचा पवित्र क्षण आहे. परंतु आज काही शक्ती आपल्या लोकशाही, संविधान आणि संवैधानिक संस्थांवर संकट निर्माण करत आहेत. अशा वेळी आपण सर्वांनी लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी संकल्पबद्ध व्हायला हवे. देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने आणि मजबुतीने कार्य करूया.” असे आवाहन केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, प्राचार्य संतोष शिंदे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांच्यासह इन्फंट जिजस सोसायटीच्या सर्व शाळा-महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

