संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चंद्रपूरकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सत्ताधारी भाजपचे दोन आमदार आपापली ताकद दाखवण्यासाठी आमनेसामने स्वागत पंडाल उभारून बसले होते. परिणामी, संपूर्ण पोलीस यंत्रणा या दोन मंचाभोवतीच फिरत राहिली, तर सर्वसामान्य गणेशभक्तांच्या सुरक्षेकडे व सोयी-सुविधेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले.
दरम्यान, सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे केवळ दोन दिवसांपूर्वी तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेला कुख्यात गुंडच चक्क माजी मंत्र्यांच्या स्वागत मंचावर विराजमान असल्याचे दृश्य उघडकीस आले. कायद्याचे रक्षण करणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असताना जिल्हा पोलीस अधीक्षक, अॅडिशनल एसपी, डीवायएसपी यांच्यासह मोठी फौज घटनास्थळी असतानाही या गुंडावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, “गणेशोत्सव हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र उत्सव आहे. हा उत्सव कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पडण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. मात्र, पोलिसांनी सत्ताधारी गटांच्या राजकीय स्पर्धेत अडकून सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेकडे व सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे तडीपारीची नोटीस मिळालेल्या गुंडाला आमदारांच्या छत्रछायेखाली मंचावर बसू देण्यात आले. हे चंद्रपूरच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.”
धोटे यांनी पुढे सांगितले की, भाजपच्या दोन आमदारांनी शेजारीच उभारलेल्या स्वागत मंचामुळे संपूर्ण विसर्जन व्यवस्थापन कोलमडले. वाहतूक कोंडी, गोंधळ, गर्दी यावर नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले. मध्यरात्रीपर्यंत अनेक गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रतीक्षेत राहिल्या, तर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्य प्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राजकीय गटबाजीच्या विळख्यात सापडल्याची तीव्र चर्चा शहरभर सुरू आहे.

