अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- भालेराव ज्युनिअर सायन्स कॉलेजच्या १९९३-९५ बारावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा तीस वर्षांनंतरचा रियुनियन सोहळा १४ सप्टेंबर रोजी केळवद रोडवरील स्प्रिंग व्हॅली येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात भालेराव गुरुजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून, गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत झाली. त्यानंतर आठवणींना उजाळा देणारे खेळ, गाणी, धमाल टायटल वितरण अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले. जुन्या मित्रमैत्रिणींनी मनसोक्त गप्पा मारत, जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या करत, एकमेकांच्या सहवासाचा मनमुराद आनंद लुटला.
३० वर्षांनंतर एकत्र जमलेल्या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. “आज पुन्हा आपण कॉलेजच्या दिवसांत परतलो आहोत,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. या रियुनियनचे आयोजन अविनाश नागपुरे,रूपेश सुप्रटकर,किशोर अंतुरकर, प्रफुल चंदनखेडे,डॉ.प्रशांत कळमधाड,किशोर ठाकरे,शीतल मोहतकर व विशाखा तांबे यांनी केले तर सूत्रसंचालन विशाखा तांबे आणि शीतल मोहतकर यांनी सांभाळले.
या कार्यक्रमाला हजर असलेले शांताराम जोगी,अरुण कळंबे, सुरेंद्र कोमुजवार,अर्चना कोहळे सीमा गुरटकर,प्रज्ञा मोवाडे,अंजू राय,धीरज ठाकरे,अमोल कोल्हे, यशपाल डहाके,मीना महाजन, प्रशांत वानखेडे,प्रीती ठाकरे व डॉ.चौधरी होते. या कार्यक्रमाच्या शेवटी भालेराव कॉलेजचे प्रकाश काकडे सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि पुढील वर्षी पुन्हा भेटू या अशा आश्वासनासह सोहळ्याची सांगता करण्यात आली.

