आलेवाही, सावरगाव, मौशी व पळसगाव (खुर्द) येथील भरती प्रकरणांमध्ये मोठे घोळ.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर :- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागभीड (जि. चंद्रपूर) येथील अंगणवाडी सेविका-मदतनीस पदभरती प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून, चुकीने दिलेले ३ सप्टेंबर २०२५ चे आदेश तातडीने रद्द न झाल्यास युवक काँग्रेस तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते गौतम गेडाम यांनी पाठविलेल्या पत्रानुसार, भरती प्रक्रियेत झालेल्या अन्यायकारक निर्णयांविरोधात त्यांनी वारंवार जिल्हा परिषदेपुढे पाठपुरावा केला. यात आलेवाही, सावरगाव, मौशी व पळसगाव (खुर्द) येथील भरती प्रकरणांमध्ये मोठे घोळ झाले असून, काही प्रकरणांमध्ये चौकशी समिती नेमली गेली, तर काही ठिकाणी चुकीची भरती रद्द करण्यात आली. मात्र आदेश रद्द होऊनही सेविका प्रत्यक्ष कामावर जात असल्याचे गंभीर वास्तव उघड झाले आहे.
विशेषतः मौशी येथील पदभरती चुकीची असल्याचे चौकशी अहवाल असूनही त्यावर योग्य ती कार्यवाही झाली नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांनी आदेश दिल्यानंतरही बाल विकास प्रकल्प अधिकारी नागभीड यांनी दुर्लक्ष केले, त्यामुळे ३ सप्टेंबरच्या आदेशात जुना निर्णयच कायम राहिला, असा आरोप गेडाम यांनी केला आहे.
पळसगाव (खुर्द) येथील भरतीत तर विवाह नोंदणी प्रमाणपत्राच्या तारखेत मोठा घोळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. संगणकातून प्रमाणपत्र २१ फेब्रुवारीला जनरेट झाले असतानाही २० फेब्रुवारी रोजीच त्याला जावक क्रमांक देण्यात आला होता. परिणामी ते प्रमाणपत्र वैध ठरत नाही. यासोबतच ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनीही उमेदवार ही गावाची रहिवासी नसल्याचे व लग्न झाले नसल्याचे लेखी निवेदन दिलेले आहे.
याप्रकरणी युवक काँग्रेसने मागणी केली आहे की, चुकीचे आदेश तातडीने रद्द करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी नागभीड व संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावे. तसेच आत्मदहनाचा इशारा दिलेल्या गौतम गेडाम यांना परावृत्त करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी. अन्यथा युवक काँग्रेस जिल्हा परिषदेपुढे तीव्र रास्तारोको आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी दिला आहे.

