संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील मौजा राळापेठ गावातील शेतकऱ्यांना अभिलेख पंजी अभावामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून अधिकार अभिलेख पंजी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील अनेक महसुली साज्यांची अधिकार अभिलेख पंजी उपलब्ध असल्याने त्या ठिकाणचे भोगवटदार वर्ग २ चे १ मध्ये रूपांतरणाची कामे नियमितपणे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, राळापेठ गावाची अभिलेख पंजी तहसिल कार्यालय किंवा भुमिअभिलेख कार्यालय गोंडपिपरी येथे उपलब्ध नसल्याने संबंधित शेतकऱ्यांचे रेकॉर्ड दुरुस्तीचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या शेतीची मालकी वडीलोपार्जीत असूनही अद्याप भोगवटदार वर्ग १ मध्ये परावर्तीत न झाल्याने शासकीय योजना, बँक कर्जे व विविध लाभ मिळविताना अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रशासनाविषयी नाराजी व नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात गोंडपिपरी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांना निवेदन देऊन, मौजा राळापेठ गावाची अधिकार अभिलेख पंजी तात्काळ उपलब्ध करून देऊन रखडलेली रेकॉर्ड दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावल्यास अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, शहराध्यक्ष राजु झाडे, युवक तालुकाध्यक्ष विपिन पेंदुलवार, अशोक रेचनकर,शुभम पिंपळकर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

