गोंडपिपरीत काँग्रेसचे जनआक्रोश व चक्काजाम आंदोलन.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मदत पॅकेजमधून सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्याला जाणूनबुजून वगळले होते. मात्र काँग्रेसच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सरकारला शेवटी चंद्रपूरचा समावेश करावा लागला, पण त्यातही गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आले आहे. ही मानसिकता लोकशाहीविरोधी असून आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आम्ही लढतो आणि लढत राहू. सत्ता येते जाते परंतु गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न कधी थांबणार नाहीत. महायुती सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न दुर्लक्षित केला आहे. कर्जमाफी, पिकांना हमीभाव, दुष्काळ जाहीर आणि पेन्शनधारकांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील असे मत खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी येथे काँग्रेस द्वारा शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, निराधार व सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आयोजित भव्य जनआक्रोश व चक्काजाम आंदोलनात व्यक्त केले.
उभ्या डोळ्यादेखत उध्वस्त होणारे पिक बघता बळीराजे आपले जिवन संपवित आहेत. चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले मात्र सरकारला त्यांच्याशी काही देणेघेणे नाही. सरकार आले कि, सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन महायुतीने दिले होते. पण ते कृतघ्न निघालेत. आता बळीराजाला हे समजून आले आहे. शेतकरी बांधवांसोबत दगाफटका करणा-यांची खैर नाही. जर शेतकऱ्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर खुर्ची खाली करा असा घणाघात यावेळी आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.
यावेळी गोंडपिपरी तालुका काँग्रेसतर्फे सरकारकडे २७ महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन तहसीलदार शुभम बहाकार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला व सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या या मागण्यांमध्ये मुख्यत्वे, भाजप सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची तात्काळ सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करणे, ओला दुष्काळ जाहीर करून सर्व पीडित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ मागे घेणे, तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करणे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी मोर्चात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, शहराध्यक्ष राजू झाडे, अशोक रेचनकर, गौतम झाडे, श्रीनिवास कुंदनुरीवार, विपिन पेदुलवार, सूरज माडूरवार, देवेंद्र बट्टे, अजय माडुरवार, तुकाराम झाडे, राजू चंदेल, शंभूजी येलेकर, तुकेश वानोडे, सोनूताई दिवशे, फिरोज पठाण, दिपक फलके, राजेश कवठे, अनिल झाडे, रेखाताई रामटेके, नामदेव सांगडे, मनोज नागापुरे, संतोष बंडावार, बालाजी चणकापुरे, अशोक कुडे, शंकर पाल, माधुरीताई येलेकर, पिंपळकर सर, साईनाथ कोडापे, सचिन फुलझले, महेंद्र कुघाडकर, शालिक झाडे, माधव लडके, धीरेंद्र नागापूरे, रफीक शेख, नरेंद्र वाघाडे, सारनाथ बस्की, अभय शेंडे, शुभम पिंपळकर, बबलू कुलमेथे, जितेंद्र गोहणे, राहुल लडके आणि प्रशांत कोसनकर यांसह गोंडपिपरी काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, निराधार, आणि हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

