संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, राजुरा येथे जी.एन.एम. (जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी) च्या चौथ्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर्स पार्टी उत्साहात साजरी करण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आनंद, रंगत आणि उत्साहाने भरलेला कार्यक्रम सादर केला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाष धोटे, विशेष अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संतोष शिंदे यासह प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनात सुभाष धोटे यांनी संस्थेच्या दर्जेदार नर्सिंग शिक्षणातील योगदानाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना करुणा, सेवा आणि प्रामाणिकपणा या मूल्यांवर आधारित व्यावसायिक जीवन घडविण्याचे आवाहन केले. तर श्री. अभिजीत धोटे यांनी नर्सिंग क्षेत्रात शिस्त, सहानुभूती आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य संतोष शिंदे यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांना शैक्षणिक तसेच क्लिनिकल प्रशिक्षणाच्या संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीते, नाटिका आणि रॅम्पवॉक या सादरीकरणांनी वातावरण रंगतदार झाले. कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने आणि नव्या उत्साहाच्या वातावरणात झाली.

