श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
भगवान भक्ती गड येथे मेळाव्यास पंकजा मुंडे संबोधित करत होत्या. दरवर्षी प्रमाणे भगवान भक्तीगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, तेलंगाना, गुजरात, कर्नाटक येथून अनेक भाविक भगवान भक्ती गडावर दर्शनासाठी आले आहेत. यावेळी आयोजित मेळाव्यास माजी मंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिन पंकजा मुंडे यांनी संबोधित केले. त्या म्हणाल्या, राज्यातुन, राज्याबाहेरून लोक आलेत. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रूपे असतात. मी देवीच्या पुढे नतमस्तक होऊन गोरगरीब, ऊस तोडणी मजुरांसाठी आशीर्वाद मागते. दसरा, नवरात्रीच्या सर्वाना शुभेच्छा. आता दसरा मेळावा आहे. हा मेळावा चिखलफेक करणाराचा नाही. चिखल तुडविणाराचा आहे.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, शिवाजी महाराज असो की भगवान बाबा यांना कुणालाच संघर्ष चुकला नाही. मुंडे साहेबांना देखील संघर्ष चुकला नाही. ज्या पक्षात कुणीही जात नव्हतं त्या पक्षाचं कमळ घेऊन त्यांनी पक्ष वाढवला. 40 वर्षांच्या आयुष्यात केवळ त्यांना साडेचार वर्षांचीच सत्ता मिळाली. माझ्यावर काही जण आरोप करतात की मी गर्दी करते. मी जिथे जाते तिथे गर्दी होते. माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी मला सांगितलं की हीच गर्दी तुमची ताकद आहे. ही गर्दी माझ्यासाठी चांगली आहे आणि पक्षासाठी देखील चांगली आहे. दोन वेळा माझ्या सभेला अमितभाई शाह आले होते. त्यांनी आपली गर्दी पाहिली, रानावनातून लोक जमा झालेले त्यांनी पाहिले. त्यामुळे मी गर्दी जमवते हा आरोप मला मान्य नाही
मी अटलबिहारी वाजपेयी, उपाध्याय यांचा वारसा चालवते.
घराणेशाहीवर त्या बोलल्या मी काही कुणाचा वारसा चालवत नाही. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही. गोपीनाथ मुंडेंनी ज्या दीनदयाल उपाध्याय यांच्या विचार आणि ज्या पक्षाचा ध्वज हाती घेतला तो वारसा मी चालवत आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी अटल बिहारी वाजपेयी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि नरेंद्र मोदी यांचा वारसा चालवत आहे. त्यांच्याकडे पाहूनच गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन राजकारणात आले. त्यांचाच वारसा मी चालवत आहे.
नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या वक्तव्याबाबतचे स्पष्टीकरण
पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की जर मी जनतेच्या मनात असेल तर माझं राजकारण मोदी देखील संपवू शकणार नाहीत. त्यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिले.
त्या म्हणल्या काही लोकांनी माझी क्लिप एडिट करून पसरवली आणि मी मोदींबद्दल बोलले असं चित्र निर्माण केलं, मी कधी माझ्या शत्रूवर सुद्धा टीका करत नाही तेव्हा ज्यांच्या विचारांवर चालते त्यांच्याविरोधात मी कसं बोलेन असं त्या म्हणाल्या.
मी कुणावरही नाराज नाही पण..
दरवेळी असं म्हटलं जातं की मी नेतृत्वावर नाराज आहे. अमक्यावर नाराज आहे. मी कुणावरही नाराज नाही. पण जर तुम्ही दसरा मेळाव्याला आला नाहीत तर मात्र मी नाराज होईन. तेव्हा कृपया मीडियावाल्यांना माझी ही विनंती आहे की मी नाराज असल्याच्या बातम्या देऊ नका. मी गेल्या 17 वर्षांपासून राजकारणात आहे. मी काही काल आले नाही. मी कुणावर नाराज असायला हे काही घरगुती भांडण नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी पदर पसरणार नाही
‘मी कुणाकडे पदर पसरून मागायला जाणार नाही. मला खुर्चीची हाव नाही,’ असे पंकजा यांनी म्हटले. भाषणाच्या शेवटीला पंकजा म्हणाल्या मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.
“खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा चारपट झाला असता”
‘हकीकत को तलाश करना पडता हैं, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती हैं’ असा शेर म्हणत त्यांनी आपल्यासंबंधी चर्चांवरही भाष्य केलं. “इथं जमलेले लोक ही ‘हकीकत’ आहे, माझी शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या, तुमची व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही. तुम्ही दाटीवाटीने इथं बसला आहात. खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता. किमान चारपट तरी झाला असता. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलं,” असं सांगत पंकजा मुंडेंनी आभार मानले.
“ज्या पक्षात कुणीच जात नव्हतं त्या पक्षात गोपीनाथ मुंडे गेले”
“गोपीनाथ मुंडेंना संघर्ष नव्हता का? त्यांच्या वाट्याला कायम संघर्ष आला. प्रवाहाविरोधात जात ज्या पक्षात कोणीच जात नव्हतं, त्या पक्षात गोपीनाथ मुंडे कमळाचं फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांचा संघर्ष कमी झाला का? ४० वर्षांच्या राजकारणात केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. हा संघर्ष कमी आहे का? त्या गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर आहे,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
तिकीट दिले तर तयारीला लागेलं.
राजकारण करताना मानवतेचे कल्याण विसरायला नको. सभा घेण्यासाठी मी फिरले की नाही. मी राज्यात फिरले. आमदार वाढले तर पक्षाची ताकद वाढते. मी 17 वर्षे राजकारणात आहे. व्यक्ती श्रेष्ठ नाही. संघटन श्रेष्ट आहे. मी नाराज नाही. मी मंत्री, आमदार नाही. स्वाभिमान आहे. मला गर्व नाही. मी असत्य कधी बोलणार नाही. सत्य कधी पराजित होत नाही. 2024 ला पक्षाने तिकीट दिले तर तयारीला लागेल. मला , पक्षाला नेत्याला त्रास द्यायचा नाही, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

