मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत प्रभावी अंमलबजावणी.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809
अहेरी…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत टिकेपल्ली गावाने अनुकरणीय कार्य करून स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता उपक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
ग्रामपंचायत चिटुगुंटा अंतर्गत येणाऱ्या टिकेपल्ली गावात, “आपलं गाव — आपली जबाबदारी” या भावनेने प्रत्येक घरातून एक व्यक्ती अशा पद्धतीने सर्व नागरिकांनी स्वेच्छेने श्रमदान केले. महिलांचा सहभागही विशेषत्वाने लक्षणीय ठरला. गावातील मुख्य रस्ते, ओसाड जागा, सार्वजनिक स्थळे, शाळा परिसर आणि गोटुल परिसर या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. केरकचरा, प्लास्टिक, गवत व इतर घाण साफ करून गावाला एक नवे रूप प्राप्त झाले.
ग्रामपंचायतीने यापूर्वीच गावातील नागरिकांना स्वच्छता उपक्रमासाठी सूचना दिल्या होत्या. ग्रामस्थांनी या सूचनांचे तंतोतंत पालन करत अत्यंत शिस्तबद्धरीत्या अभियानात भाग घेतला. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत चिटुगुंटा येथील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, कर्मचारी यांचे तसेच पेसा कोष ग्राम समितीचे आणि पोलीस पाटीलांचे सहकार्य लाभले.
या स्वच्छता मोहिमेमुळे टिकेपल्ली गावाचे रूप पालटले असून गावातील सर्वत्र स्वच्छतेचा आणि एकतेचा सुगंध पसरला आहे. नागरिकांच्या एकत्रित श्रमदानातून निर्माण झालेली ही सकारात्मक ऊर्जा ग्रामविकासासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, “स्वच्छतेतूनच आरोग्य, आणि आरोग्यतूनच समृद्धी” हा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे. येत्या काळात गावात वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, वसुंधरा संजीवनी उपक्रम, तसेच जलसंवर्धन अशा विविध उपक्रमांना देखील चालना दिली जाणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
ग्रामविकास विभागाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे टिकेपल्ली गावाने स्वच्छतेचा, लोकसहभागाचा आणि विकासाचा आदर्श घालून दिला आहे.
“गाव एकत्र आल्यास अशक्य काहीच नाही, टिकेपल्लीचा अनुभव हेच दाखवून देतो,” असे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

