मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी (गडचिरोली):
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिमलगट्टा केंद्रातील मरिगुडम येथील जिल्हा परिषद शाळेतील (वर्ग १ ते ४) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य येथील शिक्षकाच्या मनमानीमुळे धोक्यात आले आहे. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ब्रीदवाक्याला हरताळ फासणारी गंभीर परिस्थिती या शाळेत निर्माण झाली आहे.
⏰ मनमानी उपस्थिती आणि गैरसोय
शाळेत वर्ग १ ते ४ करिता विद्यार्थी असून, त्यांच्या अध्यापनासाठी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या शिक्षकाचा शाळेतील येण्या-जाण्याचा आणि उपस्थितीचा प्रकार पूर्णपणे मनमानी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
* शिक्षक मुख्यालयी न राहता अहेरी किंवा आलापल्ली (शाळेपासून सुमारे ३० ते ४० कि.मी. अंतर) येथून ये-जा करतात.
* ते कधी दुपारी १२ वाजता, तर कधी १ वाजता शाळेत येतात.
* परतीला दुपारी ३ ते ४ वाजता शाळा सोडतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे तास वाया जात आहेत.
मराठीचे ‘अज्ञान’ आणि भाषिक समस्या
या अनियमिततेचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणावर होत आहे. मरिगुडम शाळेतील वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिता व बोलता सुद्धा येत नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना आपापसात संवाद साधण्यासाठी तेलंगू भाषेचाच वापर करावा लागत आहे. प्राथमिक शिक्षणातच विद्यार्थ्यांची भाषिक प्रगती खुंटल्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशिक्षणादरम्यान पर्यायी शिक्षकाचा प्रश्न
जर नियुक्त शिक्षक प्रशिक्षण (Training) करिता अहेरी येथे गेले असतील, तर त्या काळात शाळेत पर्यायी शिक्षकाची व्यवस्था का करण्यात आली नाही, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. ‘पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करणे ही केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची जबाबदारी नाही का?’ असा थेट प्रश्न नागरिकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.
या गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

