आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्ह्यात आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना दि. 1 व 2 डिसेंबर रोजी सुटी राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
निवडणुकीच्या कामासाठी मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाणे व मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडता यावी, यासाठी जिल्ह्यातील संबंधित सर्व नगरपरिषद क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी अध्यक्ष व सदस्य पदाकरिता मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राचा ताबा घेणार आहे. त्यामुळे सोमवार दिनांक 1 डिसेंबर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक 2 डिसेंबर असे दोन दिवस जिल्ह्यातील संबंधित निवडणूक असलेल्या नगरपरिषद क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी असेल, असा आदेश जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी निर्गमित केला आहे.

