संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- काल विदर्भातील अनेक नगर पालिकेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणुका पार पडल्या. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. गडचांदूर नगर पालिका निवडणुकीत एका मतदाराने नगारा चिन्हाची बटन दाबली असता भाजपाच्या कमळ चिन्हाचे लाईट लागल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे संतापलेल्या मतदाराने थेट मतदान केंद्रातच ईव्हीएम मशीन जमिनीवर पटकून फोडून टाकल्याची घटना घडली त्यामुळे मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली.
गडचांदूर नगर पालिकेच्या सदस्य आणि अध्यक्ष पदासाठी सकाळी 7.00 वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. मतदान केंद्रावर सकाळी शांततेत मतदान सुरू होते. मात्र त्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये अचानक बिघाड झाल्याने काही वेळासाठी मशीन बंद करण्यात आली. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांगच लागली. दरम्यान त्यानंतर पून्हा सुरळीत मतदान सुरू झाले.
मात्र सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटाच्या सुमारास आदर्श हिंदी विद्यालय बुथ क्रमांक 2 येथे राम दुर्गे हा मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी केंद्रावर गेला. त्याने नगारा चिन्हा समोरचे बटण दाबले. पण भाजप उमेदवाराच्या नावासमोरील असलेल्या कमळ चिन्हाचा लाल लाईट लागला. या प्रकारामुळे मतदान करणारे राम दुर्गे चक्रावून गेले. त्याने हा प्रकार मतदान केंद्र अधिकारी यांच्या लक्षात आणून दिला.
त्याच वेळी या प्रकारामुळे संतापलेल्या राम दुर्गे याने ईव्हीएम मशीन हातात पकडली आणि जमिनीवर जोरदार आपटून थेट मशीनच फोडून टाकली. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. यावेळी मतदान केंद्रावर तैनात पोलिसांनी सर्वप्रथम राम दुर्गे यांन ताब्यात घेतले. मात्र आपला काहीच गुन्हा नाही, ईव्हीएम मध्ये नगारा चिन्हाला मत दिल्यानंतर कमळाचा लाईट लागला. हा प्रकार योग्य नाही. येथे अशाच प्रकारे मतदान झाले आहे, त्यामुळेच अशा पध्दतीने संताप व्यक्त केल्याचे सांगितले.
हा सर्व प्रकार सुरू असतांना मतदान केंद्रावर मतदानासाठी एकत्र आलेल्या संतप्त मतदारांनी भाजप मुर्दाबाद अशा घोषणा देत भाजपाचा निषेध केला. तसेच हा प्रकार इतरही मतदान केंद्रावर झालेला आहे असेही सांगण्यात आले. या घटनेनंतर मतदान केंद्रावर मोठा हंगामा व गोंधळ सुरू झाला आहे. मतदान केंद्रावर लोकांनी गर्दी केली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कॉग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी सर्वच मतदान केंद्रावर तपासणी करावी अशी मागणी केली आहे. ईव्हीएम मशीन फोडल्यानंतर ती मतदान केंद्रावर तशीच पडून होती. या घटनेमुळे मतदान केंद्रावरील अधिकारी घाबरले आहेत. याप्रकरणी कुणी काहीही बोलायला तयार नाहीत.
