विश्वनाथ जांभुळकर एटापल्लीतालुका प्रतिनिधी क्र 9421856931
एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत गेंदा अंतर्गत मौजा बारसवाडा ते चंदनवेली या सुमारे ४ किमी लांबीच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे निवेदन सादर करून रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण करण्याची मागणी केली आहे.
या मार्गावर एम. लॉयड मेटल एनर्जी लि. (सुरजगड) कंपनीच्या पाईपलाईनचे काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक झाल्याने रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
पावसाळ्यात या मार्गाने एटापल्ली मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होते. याचा परिणाम शासकीय कामकाज, दैनंदिन व्यवहार तसेच वैद्यकीय सेवांवर होत आहे. विशेषतः रुग्णवाहिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सदर रस्त्याचे CSR निधीतून मजबुतीकरण करण्यात यावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होऊन पावसाळ्यातील संपर्क समस्या दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना बि. आर. मडावी सर, अक्षय दुलसा पुंगाटी, आशिष आनंदराव भांडेकर, मंगेश नानसू दुर्वा, नामदेव वंजा हिचामी, निजान पेंदाम, कोमल चिटमलवार आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

