मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
मुंबई स्थित सायन (पुर्व) येथील सायन किल्ल्याजवळील जोगळेकरवाडी म्युनिसिपल शाळा संकुल मधील सुप्रसिध्द ज्ञानविकास नाईट हायस्कुल, सायन (पुर्व) येथे महिलांच्या उध्दारकर्त्या भारत देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला.
सन्माननीय मुख्याध्यापक प्रा. भिमराव परदेशी सर यांच्या अध्यक्षतेखाली वर्ष २०२१ ते वर्ष २०२५ दरम्यान दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत आणि वर्ष २०२५ – २०२६ मधील शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून साजरा करण्यात आला.
हा सोहळा साजरा करण्यासाठी सध्या शिक्षण घेत असलेल्या इयत्ता आठवी, नववी आणि दहावी मधील प्रामुख्याने खास पेहराव करून आलेल्या विद्यार्थिनींनी शोभिवंत स्वरुपात मेज सजवून राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा प्रतिष्ठान केली. त्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत मुख्याध्यापक परदेशी सर तसेच, उपस्थित मान्यवरांपैकी समाजसेविका दक्षा कोळी मॅडम, समाजसेविका, शैक्षणिक उपक्रमामध्ये आग्रसेर असणाऱ्या मासूम संस्थेचे शिक्षक अजित केमनाईक, विनोद पोकळे आणि माजी विद्यार्थींनीमधून हंसा जितीया, भारती तांबे यांच्या हस्ते दिप उदबत्ती प्रज्वलित करून बालिका दिन सोहळ्यास प्रारंभ झाला.
ह्या सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभागी होताना शिक्षण घेत असलेल्यांपैकी सुनिता कांबळे, जयश्री शिरसाट, वर्षा माने, संजिवनी साळवे, राजेंद्र सोनावणे ह्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपापल्या शाब्दिक साहित्यातून जगाला न कळलेल्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित चारोळ्या, उद् घोषणा, काव्यात्मक गीतातून आणि कथांतून उत्साहाने अभिवादन केले.
ह्याप्रसंगी सोहळ्याचे संचलन करणारे शालेय शिक्षक पुंडलिक सुर्यवंशी सरांनी कुप्रथेला तिलांजली देत पुरोगामी विचारातून सावित्रीमाईंनी भारतीय इतिहासात ठसा उमटवत शिक्षणाचा प्रवाहात प्रत्येक महिलांना शिक्षणाचे कवाडे मोकळे करून चूल आणि मूल ह्या पलिकडे शिक्षणाव्दारे भारत देशाच्या उच्च पदांपैकी राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान पदांवर महिलांना विराजमान होता येत आहे, असे प्रगतीकारक प्रतिपादन सुर्यवंशी सरांनी केले.
मान्यवरांपैकी माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी जितेंद्र कांबळे गुरुजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वास्तविक जीवनातून स्वतः ची ओळख निर्माण करून देणारी शिक्षणाची ताकद आपल्यामध्ये उतरवून उच्च शिक्षीत व्हावे, हिच खरी आदरांजली ठरेल असे मनोगत व्यक्त केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना मिळालेले शिक्षणाचा उपयोग करून शिक्षीत झालेल्या प्रत्येकांनी आपापल्या घरापासून विभागातून अशिक्षितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्याचबरोबर आपल्या स्वभावातून शिष्टता बाळगत विनम्रता बाळगून सुशिक्षित आणि सुसंस्कृत होणे तितकेच महत्वाचे असते, त्यावरच मनुष्याचे सुचरित्र ठरते, म्हणून शिक्षणाबरोबर जागृकता अतिआवश्यक आहे, तेव्हाच सावित्रीच्या लेकी ठरतील. त्या काळातील कुप्रथांपायी दिवसा शिक्षण देणं शक्य नसलेल्यांना रात्री शिक्षण घेता यावे, म्हणून रात्रशाळा सुरू करत सावित्रीमाईंनी नवा पायंडा घातला, हि आठवण आवर्जून सांगताना “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जग उध्दारी” असे प्रोत्साहनपर मौलिक विचारातून मार्गदर्शन करून मुख्याध्यापक परदेशी सरांनी सर्वांना प्रोत्साहित केले आणि शेवटी आभार प्रदर्शनातून ह्या बालिका दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

