मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विभागामार्फत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विवेकानंदपूर (गणेशनगर) येथे उत्साहात पार पडले. हे शिबिर “Youth for My Bharat” आणि “Youth for Digital Literacy” या संकल्पनेवर आधारित असून दिनांक २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजीत अ. मंडल होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. शंकरजी हलदार (माजी सरपंच, विवेकानंदपूर, मुलचेरा) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुपद सरदार (पोलीस पाटील, विवेकानंदपूर) तसेच संजित सिकदार (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विवेकानंदपूर) उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद तसेच रा.से.यो. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. रंजीत अ. मंडल यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे समाजघडणीत असलेले महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले. उद्घाटक श्री. शंकरजी हलदार यांनी युवकांनी श्रमप्रतिष्ठा जपून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांनी डिजिटल साक्षरतेचे वाढते महत्त्व अधोरेखित करून ग्रामीण भागात तंत्रज्ञानाची माहिती पोहोचविण्यासाठी युवकांनी योगदान द्यावे, असे मार्गदर्शन केले.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता अभियान, श्रमदान, आरोग्य तपासणी शिबिरे, सामाजिक व राष्ट्रीय विषयांवरील व्याख्याने, डिजिटल साक्षरता जनजागृती, सामाजिक प्रबोधन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांद्वारे स्वयंसेवकांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण व राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सदर शिबिराचे आयोजन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वपन बाचेर, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानदेव पुस्तोडे, रा.से.यो. स्वयंसेवक तसेच महाविद्यालयीन प्रशासनाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनीही सहकार्य केले.

