प्रणय खूणे
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्षची मागणी.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
भामरागड
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त पट्ट्यातील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रणय खूणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष.यांनी प्रत्यक्ष दौरा करून स्थानिक परिस्थितीची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
भामरागड तालुक्यातील धोंडाराज, इरपणार, प्ररायणार आणि पेनगुंडा या गावांमध्ये पोहोचून त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. या भागात दळणवळणाची साधने अत्यल्प असून विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होते, असे ग्रामस्थांनी सांगितले.
नाल्यावर पूल नसल्याने हाल
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, भामरागड तालुक्यात ये-जा करण्यासाठी मधोमध एक मोठा नाला आहे. पावसाळ्यात हा नाला पूर्ण भरून वाहतो, त्यामुळे 10 ते 12 गावांचा संपर्क तुटतो. विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांना दवाखान्यात नेणे, शासकीय कामे आणि दैनंदिन जीवन यावर याचा गंभीर परिणाम होतो.
पुलासाठी जोरदार मागणी
ग्रामस्थांनी या नाल्यावर तातडीने पुलाला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला. “पूल झाला तर आमचे जीवन सुलभ होईल; अन्यथा आम्हाला पावसाळ्यात अक्षरशः बेटासारखे जगावे लागते,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आंदोलनाचा इशारा
जर लवकरात लवकर पुलाला मंजुरी देऊन काम सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला. डॉ. खूणे यांनीही नागरिकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या अतिदुर्गम आणि संवेदनशील भागात पायाभूत सुविधा उभारण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून, प्रशासन यावर कितपत तत्परतेने निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

