अपूर्ण पुलामुळे जीवघेण्या धोका वाढला.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809
सिरोचा :
सिरोचा मुख्यालयातून रेगुठा येथे सायंकाळी ५.३० वाजता निघालेली प्रवासी बस कबालपेठा परिसरातील कच्च्या पुलामुळे अपघातग्रस्त झाली. मागील दोन वर्षांपासून पुलाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट पाइप टाकून कच्चा पूल तयार करण्यात आला होता.
सततच्या पावसामुळे व पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या बाजूची माती वाहून जात आहे. त्यामुळे पुलाची रुंदी दिवसेंदिवस कमी होत चालली होती. याच कारणामुळे चालकाला अचूक अंदाज न आल्याने बस पुलावरून घसरली.
बस मध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती; मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ताला टेकडा येथील पेद्दि सुधाकर यांनी इशारा देत सांगितले की, पुलाचे काम त्वरित सुरू न झाल्यास ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
उपसरपंच स्वामी पेटय्या गोदारी, महेश आरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर मडावी (परसेवाडा) यांनीही प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जनहितार्थ पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी आणि सुरक्षित पुल उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
