महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भिमजयंती विशेष लेख:- अगदी काही दिवसावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतासह जगात साजरी करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा दिमाखदार जीवन प्रवास, त्यांच्या अभ्यासू आणि कृतीशील व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतो. त्यांनी आकर्षक पगाराची उच्च पदे नाकारली, कारण ते शोषित वर्गातील आपल्या बधुंना विसरले नाहीत. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केले. पिचलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांचा जीवन इतिहास पाहिल्यावर, त्यांचे मुख्य योगदान आणि त्यांची प्रासंगिकता अभ्यासणे आणि त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आणि योग्य आहे. एका मतप्रवाहानुसार तीन मुद्दे आजही अधिक महत्त्वाचे आहेत. अर्थव्यवस्था आणि भारतीय समाज आजही अनेक आर्थिक, सामाजिक समस्यांना तोंड देत आहे. या समस्या सोडवण्यामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कृती आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
पण हा लेख लिहिताना एक गोष्ट मनाला खूप लागते. आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठी करतोय, पण समाज मोठा करत नाही. आपण DJ मोठा लावतोय, पण विद्यार्थ्यांची स्वप्ने मोठी करत नाही. आपण बॅनर मोठे लावतोय, पण विचार मोठे करत नाही. आणि हे वास्तव आहे, खूप कडू आहे, पण हेच सत्य आहे.
ज्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सपूर्ण आयुष्यभर भूक, अपमान, अन्याय, भेदभाव सहन करून फक्त एकच गोष्ट सांगितली “शिका” त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आज आपण काय करतो? लाखो रुपये जमा करतो, DJ लावतो, मिरवणूक काढतो, नाचतो, व्हिडिओ काढतो, स्टेटस ठेवतो… आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपलं आयुष्य तिथेच सुरू होतं. ना शिक्षण वाढतं, ना नोकऱ्या वाढतात, ना वाचन वाढतं, ना समाज बदलतो.
मग स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा.
आपण बाबासाहेबांना अभिवादन करतोय की फक्त कार्यक्रम करतोय? खरं सांगायचं तर आज अनेक गावात भिम जयंतीसाठी 2 लाख, 3 लाख, 5 लाख रुपये वर्गणी म्हणून सहज जमा होतात. पण त्याच गावात एक चांगलं वाचनालय नसतं. मुलांना अभ्यास करायला जागा नसते. स्पर्धा परीक्षेची पुस्तकं नसतात. एखाद्या गरीब मुलाला शाळा कॉलेजची फी भरायला पैसे नसतात. एखादा हुशार मुलगा फक्त पैशाअभावी शिक्षण सोडतो. एखादी मुलगी फी नसल्यामुळे पुढे शिकत नाही. पण त्याच गावात DJ मात्र 50 हजाराचा असतो. लाईट 30 हजाराची असते. बॅनर 20 हजाराचे असतात. हे आजच वास्तव आहे, आणि हे वास्तव मनाला टोचलं पाहिजे.
कारण एक गोष्ट लक्षात ठेवा.
DJ वर नाचणारा समाज कधीच इतिहास घडवत नाही; पुस्तकावर झुकणारा समाज इतिहास घडवतो. आपण एक दिवस 10 हजार लोकांची मिरवणूक काढतो, पण त्या 10 हजार लोकांमध्ये 100 अधिकारी तयार होत नाहीत. आपण 50 बॅनर लावतो, पण 50 विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास होत नाहीत. आपण स्टेज लावतो, पण अभ्यासिका लावत नाही. आपण नेत्यांना बोलावतो, पण शिक्षकांना बोलावत नाही. आपण गाणे लावतो, पण व्याख्यान ठेवत नाही. हीच खरी शोकांतिका आहे. काही लोकांना हे बोललेलं आवडणार नाही, पण सत्य नेहमी गोड नसतं. सत्य नेहमी अस्वस्थ करतं आणि समाज बदलायचा असेल तर आधी समाजाला अस्वस्थ व्हावं लागतं.
जरा सर्वांनी विचार करा.
जर एका गावाने ठरवलं की यावर्षी DJ नाही लावायचा, त्याऐवजी त्या पैशातून वाचनालय सुरू करायचं. दरवर्षी 10 गरीब विद्यार्थ्यांची फी भरायची. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू करायचं. अभ्यासिका सुरू करायची. तर 10 वर्षांनी त्या गावातून अधिकारी, शिक्षक, वकील, प्राध्यापक, लेखक, पोलीस, सैनिक तयार होतील की नाही? नक्की होतील. मग खरी जयंती कोणती — DJ ची की Library ची?
आपण एक गोष्ट विसरत आहोत.
जयंतीचा उद्देश बाबासाहेबांचा फोटो लावणे नाही, तर बाबासाहेबांसारखा माणूस तयार करणे आहे. या उभ्या समाजाला आज DJ ची गरज नाही, समाजाला Direction ची गरज आहे. समाजाला मिरवणुकीची गरज नाही, समाजाला Movement ची गरज आहे. समाजाला बॅनरची गरज नाही, समाजाला Career ची गरज आहे. समाजाला आवाजाची गरज नाही, समाजाला अभ्यासाची गरज आहे.
काळजाला लागणारी एक गोष्ट सांगतो.
आपण जयंतीसाठी वर्गणी मागायला प्रत्येक घरात जातो, पण त्या घरातलं मूल शाळेत जातं का, कॉलेजला जातं का, फी भरली का, पुस्तकं आहेत का? हे विचारायला जात नाही. हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा समाज उन्नती करतो तेव्हा तो समाज आपले हित कशात आहे हे लक्षात घेऊन कार्य करतो. आणि समाजाचे हित लक्षात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचे स्वरूप घेऊन आपण कार्यक्रमाची मांडणी केली पाहिजे. लक्षात ठेवा, जयंती मोठी करून समाज मोठा होत नाही; समाज मोठा केला तर जयंती आपोआप मोठी होते.

