सौ. हनीशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- काल परवाच नाशिक महामार्गावर ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात झाला यामध्ये आगीत होरपळून प्रवाशांचा जीव गेला.नाशिकसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चंद्रपुरातून मुंबईला जाणाऱ्या सर्व खासगी बसेसची चंद्रपुर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.
नाशिक-औरंगाबाद रोडवर खाजगी बसला आग लागून १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील प्रवाशासह बस क्षणात जळून खाक झाली. यादरम्यान, अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स बसमध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले होते का? नेमका हा अपघात कशामुळे झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान या घटनेची पुनरावृत्ती चंद्रपुरात होऊ नये यासाठी चंद्रपुर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चंद्रपूरहू नागपूर-पुणे-मुंबईला जाणाऱ्या खासगी बसेसची तपासणी करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केली प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

