🖊️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलीस ठाणे निर्मिती करावी या मागणीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ गृहविभागाला पत्र पाठवून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे अंबड व चुंचाळे येथील शिष्टमंडळाला सांगितले.
भुसे यांच्या आश्वासनानंतर नाशिक ते मुंबई पायी मोर्चा स्थगित करणे तसेच चुंचाळे परिसरातील कारगिल चौकात सुरु असलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामदास दातीर, साहेबराव दातीर व माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी दिली.
अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलीस ठाणे निर्मिती करावी या मागणीसाठी ८ ऑक्टोबर रोजी नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, सोमवारी पालकमंत्री दादा भुसे यांची आमदार देवयानी फरांदे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
या निवेदनात अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर, घरकुल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी. तसेच चुंचाळे घरकुल या भागा पासुन अंबड पोलीस ठाणे ८ ते १० किलो मिटर अंतरावर आहे. त्यामुळे अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहती साठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती करण्याची मागणी केली. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी निवेदनाची दखल घेऊन गृहविभागाला पत्र पाठविले व पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे आमदार देवयानी फरांदे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे, सामाजिक कार्यकर्ते रामदास दातीर साहेबराव दातीर व माजी नगरसेवक राकेश दोंदे उपस्थित होते. त्यानंतर कारगिल चौकात सुरु असलेले साखळी उपोषणही सोडण्यात आले. उपोषणात अरुण दातीर, समाधान दातीर, ज्योती कवर, समाधान शिंदे, जनार्दन काकडे, शशिकांत दातीर, विष्णु फडोळ, उत्तम मटाले, नवनाथ शिदे, संपत पिंगळे, जितू माळवे, गणेश पवार, नितीन दातीर, गणेश दातीर, विनायक भोर, सतीश अरोटे, नारायण राऊत आदी सहभागी झाले होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

