✒️प्रशांत जगताप
वर्धा:- जिल्हात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच वर्धा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. वर्धा येथे एकतर्फी प्रेमातून एका महिलेवर ॲसिड झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. महावीर उद्यान परिसरात ही घटना घडली आहे. महावीर उद्यानात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकानेच आपल्याच बरोबर काम करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकावर ॲसिड हल्ला केला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. अर्जुन चाफले असं आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
गुरुवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान शहरातील महावीर उद्यानात नागरिकांची चैलपैल असताना उद्यानाचा सुरक्षा रक्षक अर्जुन याने तिकीट काउंटरवर कार्यरत असलेल्या 42 वर्षीय महिलेवर एकतर्फी प्रेमातून ॲसिड हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. मात्र ओढणी असल्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या आहेत. जखमी महिलेला गार्डनच्या इतर कर्मचाऱ्यांनी सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे
घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितलं की, एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला आहे. टॉयलेट धुण्याचं ॲसिडने आरोपीने महिलेवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिलेच्या मानेवर आणि पाठीवर जखमा दिसत आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. आरोपी अर्जुन चाफले याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

