सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- दिनांक 23 ऑक्टोबर रोजी बल्लारपूर येथे भारतीय बौद्ध महासभा शहर व तालुका शाखा बल्लारपूर तसेच ग्रामपंचायत विसापूर, बामणी व पळसगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीमध्ये भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा शाखा पश्चिम च्या वतीने “वर्षावास धम्म प्रवचन मालिका ” राबविण्यात आली. यामध्ये संस्थेच्या केंद्रीय शाखेने दिलेल्या विषयाप्रमाणे बल्लारपूर शहरातील पाच बुद्ध विहारांमध्ये 19 विषयावर संस्थेचे केंद्रीय शिक्षक, शिक्षिका आणि पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्षावास धम्म प्रवचन मालिकांमध्ये भाग घेतलेल्या बल्लारपूर शहरातील आणि तालुक्यातील पाचही बुद्ध विहारातील पदाधिकाऱ्यांचे जिल्हा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाची उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्या कलाकार आयुनी. भारतीताई डुंबेरे यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला.
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने विज्ञानवादी बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारतभर केला जातो. आपल्या तालुक्यात सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विविध शिबिराचे आयोजन करावे, विविध उपक्रमाचे नियोजन करावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संस्थेचे काम प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावे असे आव्हान भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष नेताजी भरणे यांनी केले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन बल्लारपूर शहर शाखेच्या सरचिटणीस आयुनी प्राध्यापिका वनिताताई रायपुरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शेंडे मॅडम यांनी केले तसेच प्रास्ताविक केंद्रीय शिक्षिका अनुक्रलाताई वाघमारे यांनी केले या कार्यक्रमाला बल्लारपूर शहरातून आणि तालुक्यातून बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थित लाभली होती. शेवटी संस्थेच्या वतीने सरन्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

