मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक/देवळा:- येथील एक तरुण मागील 4 दिवसापासून बेपत्ता असल्यामुळे सर्वत्र त्याचा शोध सुरू होता. त्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आज दि.27 दुपारी देवळा येथील कोलथी नदीजवळ आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवळा येथील सलून व्यावसायिक तुषार काशिनाथ हिरे वय 39 वर्ष असे या तरुणाचे नाव आहे. तो सोमवारी दि. 24 पासून बेपत्ता होता.
तुषारचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ
याबाबत अधिक माहिती अशी कि, देवळा येथील सलून व्यावसायिक तुषार हिरे सोमवारी दि. 24 सकाळच्या साडेपाच वाजेपासून बेपत्ता होता. याबाबतची तक्रार हिरे यांच्या नातेवाईकांनी देवळा पोलिसांत दिली होती. सर्व ठिकाणी संपर्क करून देखील त्याचा शोध लागत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती.
अखेर तुषार हिरे याचा मृतदेह गुरुवारी 27 रोजी दुपारी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नकाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. हिरे यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.