लेखक: रणजित मेश्राम, जेष्ठ साहित्यिक विचारवंत
या देशात जात आहे. जातीचा हुडदंग आहे. ती दंगे करतेय. पंगा घेतेय. लफंगीही आहे. माणूसमारी आहे. हीच्यामुळे माणूस गौण झालाय. केन्द्रस्थानी येत नाही. हीच पूढे येतेय. माणूस खस्ता झालाय. ही मस्त !
जाती कायम जगावी असे नव्हतेच. तिचे मरण चिंतीले होते. तेच हरपले. ते शोधावे. शोध घ्यावा. काहींचे मरण मंगल असते.
जातीच्या वाईटाचे किती सांगावे ? इतिहास रडतोय. ती अजून रडवतेय. अलिकडे संघ-स्वामी मिळालाय. बऱ्यापैकी पूरवतोय. ती पुन्हा पुष्ट होतेय. ती आता विचारातही शिरतेय. हे असह्य झालेय. हे नाते डोईपलिकडचे आहे.
आंबेडकरवादी म्हटला की हीच पूढे येतेय. असे तर नव्हते. हा वाद (ism) आहे. विचाराचार आहे. जातीतून तो जरुर उपजला. जात उरावर घेण्यासाठी नव्हे ! जात गाडण्यासाठी जन्मला ! काहीतरी गोंधळ होतोय. झालाय.
गांधीवादी म्हटला की जात येत नाही. मार्क्सवादी म्हटला तेव्हाही येत नाही. हेच कशाला ? संघवादी म्हटला तेव्हाही जात येत नाही. विशिष्ट विचाराची माणसं किंवा माणूस किंवा संघटना असेच येते. तसेच ते मानले जाते. तेच पूढे सरकते.
आंबेडकरवादी म्हटला की असा विचार होत नाही. कां होऊ नये ? जात पूढे येते. आंबेडकरवादी कोणीही असू शकतो. कोणीही होऊ शकतो. जगण्याची ती रीत स्वीकारणे असते.
जो जो माणसाचे विभेदन अमान्य करतो. कालच्या बेड्या तोडतांनाच नव्या बेड्यांचा प्रतिकार करतो. जो माणूसकेन्द्री भूमिका घेतो. समतामूलक विचार करतो. दास्यता जन्मतः नसते. ती जोतली जाते. हे मान्य करतो. अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवत नाही. ईश्वर ही संकल्पना अमान्य करतो. मानसिक-भौतिक दोन्ही स्तरावर विचार करीत असतो. असाअसाच तो पूढे सरकतो. तो आंबेडकरमार्गी होत जातो. हे जाणे हेच आंबेडकरवादी होण्याकडे असते. हाच प्रयास अंततः बुध्दाकडे जातो.
आंबेडकर ही विचारप्रक्रिया आहे. आंबेडकर म्हणजे उत्तरता. निरुत्तर करणे नव्हे. उत्तर देणे असते. आंबेडकरवादाला पूरक विचार करणारेही बरेच असतात. कदाचित ते बौद्ध नसतात. काही निरिश्वरवादी असतात. अशांना आंबेडकरवादी म्हणवून घेणे आवडते. ते स्वीकारोक्त व्हावे काय ?
कोण विचार करेल ? हे आहेच. तुंबवून ठेवणे, हेही योग्य नाही. आंबेडकरवादी शब्द तसा फार हलक्यात घेतला गेला. दलित साहित्याला पर्याय देण्याच्यात हे घडले. एक तंटा जिंकता आला. मोठ्या लढाईस अडचण आली.
येणाऱ्या पिढीने सारासारता पहावी. एकदा ही सवय आली की बरीच प्रासंगिकता कमी होईल.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

