महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- एक खळबजनक घटना समोर आली आहे. एटीएम बदलून एका भामट्याने सुमारे सव्वा लाखांची रक्कम काढल्याची माहिती समोर येतात शहरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवराम फटांगरे रा. विधी महाविद्यालय मागे, संगमनेरहे पालघर येथे आरोग्य विभागात कार्यरत आहेत. दिवाळी सुट्टीनिमित्त ते आपल्या घरी आले होते. रविवारी 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वा. ते पैसे काढण्यासाठी गणेशनगर येथील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये गेले होते. यावेळी पैसे काढताना फटांगरे यांनी पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र पैसे निघाले नाही. त्यामुळे त्याच कॅबीनमध्ये असणार्या दुसर्या तरुणांनी मदत करण्याच्या बहाण्याने फटांगरे यांना तुमचे एटीएम व्यवस्थित टाकले नाही, असे म्हणून त्यांना बोलण्यात गुंतविले. तसेच एटीएमची चीप पुसून घ्यावी लागते, असे म्हणून ते एटीएम स्वतःकडे घेतले. क्षणात दुसरे कार्ड फटांगरे यांच्या हातात दिले. फटांगरे यांनी टाकलेला कोड नंबर त्याने पाहून घेतला. दरम्यान कार्ड बदलले गेले असल्याने पैशांची फारशी निकड नसल्याने तसेच पैसे निघत नसल्याने फटांगरे तेथून निघून गेले. यानंतर भामट्या तरुणाने फटांगरे यांच्या एटीएमद्वारे दोन दिवसात संगमनेरसह नाशिक, पुणे येथील विविध एटीएम मधून तब्बल 40 वेळा सुमारे 1 लाख 30 हजार रुपये काढून घेतले.

