मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- कॉलेजरोड लगत असलेल्या पाटील लेन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मनोरुग्णाने त्याच्याच राहत्या घरात आग लावल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यात घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहे. मात्र सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवत घरातील गॅस सिलींडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
एका मनोरुग्ण इसमाने आपल्याच घराला आगीचा खाईत लोटले त्यामुळे घरातील संसार उघड्यावर आला आहे याआधी देखील या व्यक्तीने असे प्रकार केल्याचे समजते.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, पाटील लेन चारमधील शारदा संकुल येथील एका सदनिकेत व्यक्ती राहत असून ती मनोरुग्ण आहे. या व्यक्तीने सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास त्याच्या घरास आग लावून तेथून निघून गेला. घरातून धुर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर विशाल करंजकर यांनी याची माहिती अग्निशमन दलास कळवली. पंचवटी विभागातील दोन बंब तातडीने घटनास्थळी गेले. आग पसरल्याने घरातील टीव्ही, फर्निचर, कपडे आदी जळून खाक झाले. घरात दोन सिलींडर होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही सिलींडर शोधून ते घराबाहेर आणून सुरक्षीत स्थळी ठेवल्याने अनर्थ टळला. या व्यक्तीविराेधात परिसरातील नागरिकांनी याआधी पोलिसांकडे तक्रारी केल्याचे समजते. त्याने दोन वेळा असाच प्रकार केल्याची चर्चा परिसरात आहे.