✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
वर्धा: – मतदार याद्या अधिकाधिक त्रुटीरहीत करण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंक करण्याची मोहिम निवडणूक आयोगाच्या वतीने वर्धा मतदारसंघात सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार रमेश कोळपे यांनी केले आहे.
मतदार याद्या अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी तसेच दुबार नावे असणे, पत्ता अपूर्ण असण्या सारखे दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्वभूमीवर मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. यामुळे मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे, एकाच व्यक्तीचे एकापेक्षा अधिक मतदारसंघात अथवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिकवेळा नावाची नोंदणी तपासण्यासाठी आधार क्रमांकाचे संकलन उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मतदार ओळख पटवणे, मतदार यादीत समाविष्ठ माहितीची पडताळणी करणे सोपे होणार आहे.
मतदारांनी घरबसल्या मोबाईल ॲप (Voter Helpline) तसेच NVSP.IN संकेतस्थळावर नमुना 06 ब भरुन मतदान कार्डला आधार लिंक करावा. तसे शक्य न झाल्यास आधारकार्डची सांक्षाकित प्रतही मतदाराला प्रत्यक्ष तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करता येईल, असे तहसिलदार यांनी कळविले आहे.

