सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील शहरातील अत्यंत रहदारीच्या जटपुरा गेट परिसरात असलेल्या एमफोरयू या कापड दुकानाला भीषण आग लागल्याने लाखोंचा माल खाक झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
जटपुरा येथे दुकानाला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला कळताच अग्निशमन पथक अवघ्या काही वेळातच घटनास्थळावर पोहोचून आगेवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. पण या आगीत दुकानातील लाखोंचा माल खाक झाला आहे.
चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरातील वसंत भवनाच्या चाळीत बरीच दुकाने आहेत. या मार्गावरील दुकानांतही प्रचंड गर्दी असते. वाहनांनी गजबजलेल्या वसंत भवनाच्या चाळीत एमफोरयू नावाचे कापड काही वर्षांपासून सुरू आहे. या कापड दुकानाला गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे मोठी तारांबळ उडाली. नागरिकांची गर्दी उसळल्याने वाहतुकीचाही खाेळंबा निर्माण झाला. आग लागताच लगेच महानगर पालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. पथक अवघ्या काही वेळात घटनास्थळावर पोहोचले. पाण्याचा मारा करून आग विझविण्यास यश मिळविले. मात्र, तोपर्यंत आगीत दुकानातील लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमध्ये लागल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

