युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया बँक येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया बँक येथील आयटी व्यवस्थापक आणि आऊटसोर्स केलेल्या कंपनीतील हार्डवेअर इंजिनिअरने बॅंक व ग्राहकांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे.
आपले घामाची कमाई ठेवण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे बँक आहे. पण जेव्हा बँक मध्ये काम करणारे कर्मचारीच नागरिकाच्या घामाच्या पैशाला चुना लावून फसवणूक करत असेल तर विश्वास कुणावर करायचा हा मोठा प्रश्न आज बँक मध्ये पैसा ठेवणाऱ्या ग्राहकांना पडला आहे.
आयटी व्यवस्थापक आणि आऊटसोर्स केलेल्या कंपनीतील हार्डवेअर इंजिनिअर या दोघांनी एका सफाई कर्मचाऱ्याशी संगनमत करून बँक मध्ये खाते असलेल्या ग्राहकांच्या खोट्या सह्या करून ही रक्कम विविध खात्यातून काढली. हा प्रकार लक्षात येताच बॅंकेकडून तक्रार करण्यात आली व पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
सतीश खंगार वय 44 वर्ष, आयटी व्यवस्थापक, राहुल सुर्यवंशी वय 32 वर्ष, हार्डवेअर इंजिनिअर व आशीष वाढवे वय 32 वर्ष, सफाई कर्मचारी अशी ग्राहकांच्या पैशाला चुना लावणाऱ्या आरोपींची नावे आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून पुण्यातील एका कंपनीसोबत हार्डवेअरबाबत करार करण्यात आला आहे. राहुल त्या कंपनीचा निवासी प्रतिनिधी आहे. 15 सप्टेंबर रोजी एका महिला ग्राहकाने तिच्या खात्यातून कुणीतरी साडेचार लाख रुपये परस्पर काढण्याची तक्रार केली व त्यानंतर बॅंकेने अंतर्गत चौकशी सुरू केली.
त्यातून हा प्रकार समोर आला. या तिनही आरोपींनी काही ग्राहकांच्या खोट्या सह्या करून बॅंकेतून 20 लाख 88 हजार रुपयांची रक्कम काढली. सफाई कर्मचारी असलेल्या आशीषला हाताशी धरून त्यांनी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या खात्यातून चार लाख रुपये काढले. सीसीटीव्हीतून ही बाब समोर आली. 13 जून 2022 ते 05 सप्टेंबर 2022 या कालावधीत फसवणूकीचा हा प्रकार समोर होता. बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक समीर घोरमाडे यांच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात पोलिस तपास करत आहे.