महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- संगमनेर शहरातील बस स्थानक परिसरासह नवीन नगर रोडवर व स्वतःला युवा नेते समजणारे काहीजण नगरपालिकेची कुठल्याही प्रकारचे परवानगी न घेता मोठ- मोठे फ्लेक्स लावत आहे. या फ्लेक्समुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बस स्थानकाचे अक्षरशः विद्रूपीकरण होत आहे, मात्र याकडे नगरपालिके सह बसस्थानक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बस स्थानक परिसरात भाजप शिंदे सरकार तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचेसुद्धा फोटो टाकून फ्लेक्स लावल्याने तो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
संगमनेरातील प्रस्थानक परिसरात मोठ-मोठे फ्लेक्स लावून आपल्याच कार्यकर्त्यांनी बस स्थानकाचे विद्रूपीकरण केल्याची बाब काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, आ. बाळासाहेब थोरात यांच्या लक्षात येताच, त्यांनी आपल्या चालकास गाडी बस स्थानक आवारात घेण्यास सांगितले. पालिका अधिकार्यांना बोलावून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी स्वतःचा फोटो लावलेला मोठा फ्लेक्स काढण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर यापुढे या भागामध्ये कोणाचाही फ्लेक्स लागणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, याबाबत सक्त सूचना उपस्थित अधिकार्यांना केल्या होत्या. आ. थोरात यांच्या सक्त आदेशा नंतर साधारणतः वर्षभर बस स्थानक परिसरात एकही फ्लेक्स न लावता संपूर्ण परिसर फ्लेक्समुक्त झाला होता.
आता पुन्हा वर्षानंतर बस स्थानक परिसरात जेथे-थे परिस्थिती निर्माण झाली आहे. कुणाची निवड झाली, कोणाचा वाढ दिवस आला, कुणाच्या दुकानाचे उद्घाटन असलं की, या ठिकाणी हमखास फ्लेक्स लावले जातात. पुन्हा एकदा बसस्थानक आवारात फ्लेक्स लागत असल्याने या परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे.
संगमनेर शहरात नवीन नगर रोडवरील इंदिरा गांधी तैलचित्राजवळ भाजप आणि शिंदे गट व उद्धव ठाकरे गटासह काँग्रेसचे एकूण 25 फोटो असलेला फ्लेक्स एका ज्येष्ठ नागरिकाने लावला आहे. या फ्लेक्सवर ‘राम- राम गेलं आणि जय श्रीराम आलं!’ असा मथळा लिहिण्यात आला आहे. त्याखाली ‘उद्धवा अजब तुझे सरकार, एकनाथा अजब तुझा चमत्कार, हा माझा शेवटच्या क्षणापर्यंत नमस्कार, भारत माता की जय, वंदे मातरम् व मातृभूमी तुझे सलाम’ आणि शेवटी ज्येष्ठ नागरिकाच्या हातात तिरंगा ध्वज घेतलेला फोटो असलेला फ्लेक्स संगमनेर शहरात चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. नेमकं त्या ज्येष्ठ नागरिकाला या फ्लेक्समधून काय म्हणायचं आहे? याचा उलगडा अनेकांना झालेला दिसत नाही.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348