पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
चाकण पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड
पुणे : जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात असलेल्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हाळुंगे चौकीच्या हद्दीतल्या खराबवाडी गावाच्या हद्दीत वाण्याचा मळा येथे अज्ञात इसमानं एका अनोळखी महिलेचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा चेहरा दगडानं ठेचून विद्रूप केला.
विनायक रेवजी खराबी यांच्या शेतजमिनीतल्या ओढ्याजवळ या महिलेचा मृतदेह आढळून आला. दि. २० नोव्हेंबर रोजी ही निर्घृण हत्या उघडकीला आली. निकिता संभाजी कांबळे (वय २८, रा. खराबवाडी, ता. खेड, जिल्हा पुणे, मूळ रा. कवठा ता. उमरगा, जिल्हा – उस्मानाबाद ) असं या महिलेचं नाव आहे.
विशेष म्हणजे या हत्येत सहभागी असलेल्या संशयित आरोपीच्या चाकण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या. राम कुंडलिक सूर्यवंशी (वय ३९ रा. पवार वस्ती, साईबाबा मंदीर, दापोडी, पुणे) असं संशयित आरोपीचं नाव आहे.
आरोपी राम सूर्यवंशी आणि मयत महिला निकिता कांबळे ही दोघं पिंपरी चिंचवडच्या एका माॅलमध्ये कामाला होते. तिथं या दोघांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दरम्यान, मयत महिलेचं दुसर्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा आरोपी राम सूर्यवंशीला संशय आला.
दरम्यान, आरोपी राम सूर्यवंशीचं लग्न झालेलं असून त्याच्या घरच्यांना याविषयी समजल्यानं पत्नीसह घरातलं कोणीही आरोपी राम सूर्यवंशीसोबत बोलत नव्हतं. मयत निकिता कांबळे हीदेखील त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. त्यामुळे रागाच्या भरात त्यानं तिचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा चेहरा विद्रूप केला.
पोलिसांनी याविषयी चौकशी केली असता आरोपी राम सूर्यवंशीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. ‘मयत महिला ही माझी मैत्रीण होती, तिचा कोणी खून केला’, असं विचारत आरोपी राम सूर्यवंशीनं जोरजोरात रडत तपासी पोलीस पथकाची दिशाभूल करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
पोलिसांनी व्यवस्थितपणे चौकशी केल्यानंतर आरोपी राम सूर्यवंशीने गुन्ह्याची कबूली दिली. पुण्याच्या सिम्बाॅयसिस महाविद्यालयाच्या आवारात पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीनं पकडलं.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डाॅ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, सागर जैनक,अंकुश लांडे, राजकुमार हनुमंते, योगेश कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, राजेंद्र शेटे आदींच्या पथकानं ही कारवाई केली.

